कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्दैवी याचा करावा तेवढा निषेध कमीच – सुप्रिया सुळे

जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्दैवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, वन नेशन, वन इलेक्शन विषयावर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बैठकीदरम्यान जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील घटनेबाबत माहिती मिळाली. यानंतर काही वेळात मला पुण्यातील सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पुण्यातील दोन नागरिकांना गोळ्या लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांशी संपर्क साधून माहिती घेतली आणि केंद्राकडे तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल. जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करावीत. असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कश्मीरमधून परतणाऱ्या पर्यटकांना जास्त दराने तिकीटे घ्यावी लागत आहेत, त्यामुळे रेल्वे आणि विमान वाहतूक मंत्रालयाने या समस्येवर मार्ग काढावा. सध्या अनेक भारतीय नागरिक विविध भागांत अडकले असून, त्यांचं सुरक्षितरित्या घरी पोहोचणं हेच सध्या सर्वात महत्त्वाचं आहे. ही काही नफा कमावण्याची वेळ नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. असे सांगत त्यांनी शासन आणि प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. संपूर्ण घटनेबाबतची माहिती मिळेपर्यंत संयम, सहकार्य आणि जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी सर्वसामान्य नागरिकांनाही केले आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंधरा दिवसापूर्वी गृह मंत्रालयाला दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती मिळाली होती, अशी चर्चा होत आहे. कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची गृहमंत्रालयाने सविस्तर माहिती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व घडामोडींची माहिती घेतल्यानंतर तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांना योग्य माहिती द्यावी. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.