रोह्यातील सरकारी गोदामात 600 टन धान्य सडले; माथाडी कामगारांचा संप मिटेना, रेशनिंग दुकानांना टाळे, गोरगरीबांवर उपासमारीची वेळ

रोहा येथील सरकारी गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यात जिल्हा पुरवठा विभाग अपयशी ठरला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून गोदामात पडून असलेले सुमारे 600 टन धान्य सडले आहे. गोदामाबाहेर चार ट्रक महिनाभरापासून उभे असून त्यातील धान्याच्या गोणी उतरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या धान्याला कुबट वास येत असून तेही खराब होण्याच्या मार्गावर आहे. धान्याचे वितरण न झाल्यामुळे अनेक गावांतील रेशनिंग दुकानांना टाळे लागले असल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यातील 21 शासकीय धान्य गोदामांमध्ये सात हमाल संस्थांना हमालीचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटांची मुदत 2022 मध्ये संपली. त्यानंतर हमाल संस्थांना वेळोवेळी तात्पुरती मुदतवाढ दिली जात आहे. रोह्यातील हमालांनी प्रलंबित हमाली देयके, माथाडी मंडळाने निश्चित केलेल्या सुधारित दरांची (खंड 33 अंतर्गत) अंमलबजावणी करणे, मुदतवाढीऐवजी नव्याने निविदा प्रक्रिया करणे आदी मागण्यांसाठी 17जानेवारीपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात जिल्हा पुरवठा विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे कामगारांनी आपला संप मागे घेतलेला नाही. या संपाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील रेशनिंग धान्य दुकानांवर झाला आहे. धान्य पुरवठा होत नसल्याने दुकानांना टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे गोरगरीब कुटुंबांना खासगी दुकानांमध्ये महाग दराने धान्य खरेदी करावे लागत आहे.
रोह्याच्या सरकारी गोदामात सहाशे टन धान्य पडून आहे. तसेच कळंबोली, तळोजा येथून आलेल्या धान्य वाहनांमध्ये शंभर टन धान्य भरलेले आहे. गाड्यांमधील धान्य खाली करण्यासाठी हमाल नसल्याने एक महिन्यापासून या गाड्या गोदामासमोर उभ्या आहेत. राज्यभरातील माथाडी हमालांनी केलेला संप मिटतो, त्यांच्या मागण्या मान्य होतात. मग रायगडमधील कामगारांचा संप का मिटत नाही, असा सवाल यावेळी रेशन दुकानदार संघटनेने केला आहे. हा संप रायगड जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतला नसल्याचा आरोप रेशन दुकानदार संघटनेने केला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी नॉट रिचेबल
माथाडी कामगारांचा संप मिटवण्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नॉट रिचेबल झाल्याने रेशनिंग दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर हे आंदोलन तातडीने मिटले नाही तर जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा रेशनिंग दुकानदार संघटनेने दिला आहे.