
>> प्रभाकर पवार, [email protected]
श्रीमती अश्विनी बिद्रे-गोरे या आपल्या सहकारी अधिकारी महिलेची अत्यंत निघृणपणे हत्या करणारा साठीकडे झुकलेला ठाणे जिल्हा गुन्हे शाखेचा (एलसीबी) तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यास पनवेल जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर कुरुंदकरला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या कुंदन भंडारी (कुरुंदकरचा ड्रायव्हर), महेश फळणीकर (बँक कर्मचारी व कुरुंदकरचा जवळचा मित्र) यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुतण्या राजू पाटील याची मात्र न्यायाधीशांनी निर्दोष सुटका केली.
अश्विनी ही मूळच्या कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावची! 2005 साली राजू गोरे या तरुणाबरोबर तिचा विवाह झाला. त्यानंतर एका वर्षात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अश्विनी उपनिरीक्षक झाली तिची पहिली नेमणूक पुणे, त्यानंतर सांगली येथे झाली तेव्हापासूनच तिचा मृत्यूचा प्रवास सुरू झाला. सांगली पोलीस ठाण्याच्या अभय कुरुंदकर या अधिकाऱ्याशी तिचे संबंध वाढले. अभय कुरुंदकर हा एक वजनदार अधिकारी व एका माजी मंत्र्याचा ‘ब्ल्यू आयड़ बॉय’ कुणालाही हव्या त्या ठिकाणी हवी ती पोस्टिंग मिळवून देणारा. अशा या अधिकाऱ्याने अश्विनीला आपल्या प्रेमात पाडले. अभय कुरुंदकर व अश्विनी हे दोघेही विवाहित प्रकरण दोघांच्या घरात पोहोचले तेव्हा भांडणे होऊ लागली. प्रकरण जड व आपला हेतू साध्य झाल्यावर अभय कुरुंदकर याने कळंबोलीला राहणाऱ्या अश्विनीला ठाण्यात बोलावून घेतले. आपल्या मीरा रोड येथील भाड्याच्या फ्लॅटवर तिला नेले आणि तिच्या डोक्यात क्रिकेटची बॅट हाणून तिला ठार मारले. आपल्या साथीदारांच्या मदतीने लाकूड कापण्याच्या कटरने त्याने अश्विनीच्या शरीराचे लहान-लहान तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले व दुसऱ्या दिवशी सर्व तुकडे गोणीत भरून वसई खाडीत फेकून दिले गोण तरंगू नये म्हणून जड वजने गोणीला बांधली. अशा या क्रूरकर्त्याला न्यायाधीशांनी सोमवारी जन्मठेप ठोठावली, परंतु अशा या निर्दयी पोलीस अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी अश्विनीच्या पतीने व मुलीने केली आहे.
11 एप्रिल 2016 रोजी रात्री अश्विनीची हत्या झाली. त्यानंतर तीन महिन्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अश्विनी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने केली. त्या वेळी प्रभात रंजन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांची बदली झाल्यावर हेमंत नगराळे यांनी 13 मे 2016 रोजी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली. दोन वर्षे त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून मुकुट मिरविला. परंतु आपल्याच खात्यात काम करणाऱ्या, बेपत्ता झालेल्या एका अधिकारी महिलेचा शोध घेण्यासाठी त्यांनी काही विशेष प्रयत्न केले नाहीत वा आपल्या सहकाऱ्यांना तपास करण्याचे आदेशही दिले नाहीत. नवी मुंबईत क्रीम पोस्टिंग मिळविणारे बहुसंख्य अधिकारी ‘अर्थ व्यवहारात’ व्यस्त असतात हे कुणा जोतिष्याला सांगायची गरज नाही. त्यामुळे तक्रार करणाऱ्या अश्विनीच्या नातेवाईकांना न्याय मिळाला नाही. अश्विनीचा पती राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले 31 जानेवारी 2017 ला गुन्हा दाखल झाला. वर्षभराने कुरुंदकरला अटक झाली. तोपर्यंत कुरुंदकरने सारे पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे अश्विनीच्या शरीराचा एक अवयवही अखेरपर्यंत सापडला नव्हता.
ज्या दिवशी अश्विनीला ठार (11 एप्रिल 2016 रोजी) मारण्यात आले, त्याच दिवशी ठाणे क्राईम ब्रँचला (ग्रामीण) असलेल्या कुरुंदकरने आपण रात्री गस्तीवर (नाईट राऊंड) होतो अशी खोटी स्टेशन डायरी केली. अश्विनीच्या मोबाईल फोनवरून त्याने ती जिवंत असल्याचे दाखविले. अनेकांना मॅसेज पाठविले. अशा या खाकी वर्दीतील माफियाचा तपासात भंडाफोड झाला. ठाण्याच्या मनसुख हिरेनची हत्या करणारा, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीसमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी पार्क करणारा सचिन वाझे हा अधिकारीही खोट्या स्टेशन डायऱ्या करायचा कुरुंदकर, सचिन वाझेसारखे असे बरेच पोलीस अधिकारी आहेत. पोलीस ठाण्यात खोट्या डायऱ्या करून आपली पापे लपविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांनाही अडकविण्याचा प्रयत्न करतात, परंतु कालांतराने सत्य उघडकीस येते. असे हे अधिकारी पोलीस दलाला लागलेला कलंक आहे. कुरुंदकरसारख्या अधिकाऱ्यांना राजकीय बळ असते. त्यामुळेच ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतात. अश्विनी बेपत्ता प्रकरणी कुरुंदकरविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही त्याच्या नावाची राष्ट्रपती पदकासाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून राजकीय दबावाखाली शिफारस केली गेली. नवी मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अश्विनीच्या पतीला व तिच्या मुलीला हाकलून लावले, त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही परंतु न्यायालयाने अश्विनी व तिच्या नातेवाईकांना न्याय दिला. कुरुंदकरच्या खोट्या स्टेशन डायरीची चिरफाड केली याचा अर्थ अजूनही न्याय शिल्लक आहे असे वाटते. न्यायालयाने जर दखल घेतली नसती तर अश्विनीची पोलीस दप्तरी बेपत्ताच अशीच नोंद राहिली असती. गुन्हा दाखल झाल्यावर कुरुंदकर 9 महिने गायब होता. त्यानंतर त्याला पुन्हा शासनाने कामावर रुजू करून घेतले होते. यावरून कुरुंदकर किती हेवीवेट आकाचा आका होता हे लक्षात येईल.