
मराठवाडय़ात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल 269 शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आले आहे. एकीकडे पाणीटंचाई आणि दुसरीकडे पाण्याअभावी करपून चाललेली पिके अशा दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच कालावधीत 204 शेतकऱयांनी आत्महत्या केली होती.
मध्य महाराष्ट्रातील आठ जिह्यांत अत्यंत कमी पाऊस पडतो. मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बी-बियाण्यांसाठी तसेच शेतकी अवजारांसाठी घेतलेले कर्ज, इतर गरजांसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर असताना पावसाने दगा दिला की शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा वाढत जातो. त्यामुळे शेतकरी जीवन संपवत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या
बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱयांच्या आत्महत्या होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. जानेवारी ते मार्च यादरम्यान येथे 44 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. तर यंदा याच कालावधीत 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावरून येथे शेतकऱयांच्या मृत्यूचा आकडा वाढताच असल्याचे समोर आले आहे. मराठवाडय़ात 2024च्या पहिल्या तीन महिन्यांत 204 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. त्यात वाढ होऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱयांचा आकडा यंदा 269वर पोहोचला.