
अमरनाथ यात्रेआधी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा थैमान घातले आहे. आज पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म आणि नाव विचारून त्यातील हिंदूंना टिपून मारले. ‘जाओ जाकर मोदी को बता दो’ असे बचावलेल्या पर्यटकांना धमकावत दहशतवाद्यांनी पळ काढला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जण जखमी झाले. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा मोदींच्या राजवटीतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून सुरक्षा व्यवस्थेच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या आहेत. दरम्यान, या भयंकर हल्ल्यानंतर मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पहलगाम येथील बेसराण पर्वतावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर हा हल्ला करण्यात आला. जखमींमध्ये काही स्थानिक नागरिक तर काही पर्यटकांचा समावेश आहे. हल्ल्यानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही जण रक्ताच्या थारोळय़ात जमिनीवर निपचीत पडले आहेत, तर एक महिला माझ्या पतीला वाचवा, त्याला गोळी लागली आहे असा आक्रोश करताना दिसत आहे. घटनेनंतर पर्यटकांच्या मदतीसाठी लष्कराची हेलिकॉप्टर्स तत्काळ रवाना झाली. जखमी पर्यटकांना घटनास्थळावरून हलवून पहलगाम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही पर्यटकांना स्थानिकांनीच रुग्णालयात नेण्यासाठी मदत केल्याचे लष्कराच्या अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.
टीआरएफने घेतली हल्ल्याची जबाबदारी
टीआरएफ अर्थात द रेझिस्टन्स फ्रंट या लश्कर ए तोयबाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, दहशतवाद्यांची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
डोंबिवलीच्या तिघा भावांचा तर, पनवेलमधील एकाचा मृत्यू
या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघा मावसभावांचा आणि पनवेलच्या खांदा कॉलनीत राहाणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला.
- कुटुंबासमोरच आयबी अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या
- मोदी दौरा अर्धवट सोडून सौदीतून निघाले; अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये
- मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात हाय अॅलर्ट
अतिरेकी म्हणाला, जाके मोदी को बताओ!
कर्नाटकच्या मंजूनाथ शिवामु यांना पत्नीसमोरच गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर जाके मोदी को बताओ, असे दरडावत दहशतवादी पसार झाले.
चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न!
मधुचंद्रासाठी कश्मीरला गेलेली नवविवाहिता डोळ्यांदेखत पतीचा मृत्यू झाल्याने सुन्न झाली. लाल चुडा घातलेल्या अवस्थेतील तिच्या फोटोने मन हेलावले.
महाभयंकर घटना रक्ताचा सडा, किंकाळ्या आणि आक्रोश…अवघा देश चिंतेत
अमरनाथ यात्रेआधी हल्ल्याने खळबळ
तोयबाच्या टीआरएफने स्वीकारली जबाबदारी