‘मला तुमची मुलगी द्या’ म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले! बीड पोलिसांनो, बांगड्या भरा!

बीडमधील गावगुंडांसमोर पोलिसांनी सपशेल बांगडय़ा भरल्याचे दिसून येत आहे. केज तालुक्यात एकतर्फी प्रेमातून गवंडीकाम करणाऱ्या एका गावगुंडाने ‘तुमची मुलगी मला द्या’ असे म्हणत एका शिक्षकाला गाडीसह ट्रक्टरखाली चिरडले! गंभीर अवस्थेत या शिक्षकाला बीड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या गुंडाच्या विरोधात यापूर्वी अॅट्रॉसिटी आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असून तो नुकताच जामिनावर सुटला आहे.

बाजीराव डोईफोडे हे तालुक्यातील वरपगाव येथे शिक्षक आहेत. केजहून ते दररोज वरपगावला जाऊन येऊन करतात. डोईफोडे यांच्या मुलीला सूरज दिलीप गुंड (28) हा एकतर्फी प्रेमातून बऱ्याच दिवसांपासून त्रास देत होता. ‘तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते व्हायरल करीन!’ अशी धमकीही तो दिला देत होता. सूरजच्या विरोधात डोईफोडे कुटुंबाने शिवाजीनगर आणि केज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.

कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

सूरजच्या गुंडगिरीमुळे डोईफोडे कुटुंब दहशतीखाली आहे. पोलिसांकडे दाद मागूनही उपयोग होत नाही. सूरजला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी या कुटुंबाची मागणी असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ट्रॅक्टरखाली चारचाकी चिरडली

पोलिसांनी सूरजच्या मस्तवालपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची मुजोरी वाढली. बाजीराव डोईफोडे हे आज वरपगावकडे जात असताना सूरजने त्यांची चारचाकी अडवून ‘तुमची मुलगी मला द्या, माझे लग्न तुमच्या मुलीशी लावून द्या’ अशी मागणी केली. मात्र बाजीराव डोईफोडे यांनी सूरजला झिडकारले. त्यानंतर एकतर्फी प्रेमात अंध झालेल्या सूरजने डोईफोडे यांच्या चारचाकीवर भरधाव ट्रॅक्टर घातला. एवढेच नाही तर डोईफोडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात बाजीराव डोईफोडे हे गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना अगोदर केजच्या रुग्णालयात आणि त्यानंतर बीड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.