मुंबईचे दुहेरी ध्येय आज हैदराबादविरुद्ध लढत

पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभवाची नामुष्की सहन करणाऱया मुंबईला अखेर विजयाचा सूर गवसला आहे. सलग तीन सामन्यांत दणदणीत विजयाची नोंद करणाऱ्या मुंबईने हैदराबादला परतीच्या सामन्यात नमवत चौकाराचे ध्येय समोर ठेवले आहे. एवढेच नव्हे तर हैदराबादवर दणदणीत मात करत सहाव्या स्थानी असलेल्या मुंबईने गुणतालिकेत थेट तिसऱया स्थानी झेप घेण्याचेही लक्ष्य निश्चित केले आहे.

मुंबईने गेल्या सामन्यात चेन्नईचा 9 विकेटने धुव्वा उडवत आपल्या पहिल्या पराभवाचा सव्याज वचपा काढला होता. या विजयामुळे मुंबईच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यातच रोहित शर्माच्या बॅटला धावांची भूक लागल्यामुळे मुंबई संघातही आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुंबईकडून सध्या सूर्यकुमार यादवच सातत्याने खेळतोय, मात्र अन्य फलंदाजांना अद्याप आपल्या प्रतिभेला न्याय देता आलेला नाही. दुसरीकडे हैदराबादला हा सामना जिंकू किंवा मरू असाच आहे. त्यामुळे मुंबईला हरवण्याचे एकमेव ध्येयच त्यांच्यापुढे उरलेय. जर जिंकले तर त्यांचे आव्हान कायम राहील, मात्र हरले तर गतउपविजेत्या हैदराबादवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की सहन करावी लागेल.