‘26/11’ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची डीवायएसपीपदी नियुक्ती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले नियुक्तीचे आदेश

मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पोलीस कॉन्स्टेबल अंबादास पवार यांची पत्नी कल्पना पवार यांची ‘डीवायएसपी’ पदावर थेट नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे आदेशपत्र आज प्रदान करण्यात आले.

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधून समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत तब्बल 160 हून अधिक निरपराध्यांचे बळी घेतले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईची शान असलेल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांना वीरमरण आले. यानंतर दहशतवाद्यांनी एक स्कोडा कार हायजॅक करीत मलबार हिलला जाण्यासाठी निघाले, मात्र ही कार रोखण्यासाठी डीबी मार्ग पोलिसांच्या टीमने गिरगाव चौपाटी येथे नाकाबंदी केली. या ठिकाणी कार येताच कार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र यावेळी दहशतवादी कसाबने ‘एके-47’मधून रायफलने पोलिसांवर फायरिंग केले.

माझ्या पतीप्रमाणे आता मलाही देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे. हे माझ्या नियुक्तीमुळे सिद्ध झाले आहे. – कल्पना पवार, वीरपत्नी