
विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकल्या आहेत. राज्यभरात सर्वत्रच उच्चांकी तापमान नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले असून अनेक भागांत अघोषित संचारबंदीचे चित्र दिसत आहे. सकाळी 10 नंतर रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही तापमानात मोठी वाढ झाली असून उन्हात चालताना मुंबईकरांची प्रचंड दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीचे काम असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, असा सल्ला डॉक्टर तसेच हवामानतज्ञांनी दिला आहे.
हवामान खात्याने विदर्भात गुरुवारपर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने राज्यात उष्णतेची लाट धडकली आहे. ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नवी मुंबई या शहरी भागांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मुंबई व परिसरात पुढील आठवडाभर कमाल तापमान 34 ते 35 अंशांच्या आसपास, तर किमान तापमान 24 ते 26 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उच्चांकी तापमानामुळे नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले आहे. त्यामुळे विदर्भासह राज्याच्या अनेक भागांमध्ये दिवसा अघोषित संचारबंदीचे चित्र दिसत आहे. सकाळी 10 नंतर रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यांत मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.
चंद्रपूर सर्वाधिक उष्ण; तापमान 46 अंशांवर
राज्यात चंद्रपूर सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. सोमवारी चंद्रपूरचे तापमान 46 अंशांवर गेले. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी – 45 अंश, अमरावती – 44.6 व अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंद झाले. मंगळवारीही 45 ते 46 अंशांवर पारा होता. 24 एप्रिलपर्यंत हीच होरपळ असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.