सामना अग्रलेख – हिटलर जिवंत आहे!

प्रे ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन करणारे अमेरिकेचे आंदोलनकर्ते म्हणतात, ‘येथे हिटलरशाही आणि हुकूमशाही चालणार नाही. ट्रम्प यांनी सत्ता टिकवण्यासाठी स्वतःच्या देशातच फूट पाडली आहे.’ भारतात तरी यापेक्षा वेगळे काय घडत आहे? भारतातही फूट पाडली गेली आहे. मोदी यांच्या कारभाराची तुलना हिटलरशीच केली जाते. प्रे. ट्रम्पही हिटलर अंगात संचारल्याप्रमाणे वागत आहेत. प्रे. ट्रम्प यांना अमेरिकेच्या जनतेने हिटलर ठरवले आहे. पंतप्रधान मोदी हे प्रे. ट्रम्प यांचे भक्त आहेत. हिटलरला विश्वविजेता व्हायचे होते. मोदी हे स्वयंभू विश्वगुरू म्हणून घोषित झालेच आहेत. थोडक्यात, हिटलर जिवंत आहे!

विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. बोस्टनमधील ब्राऊन विद्यापीठात गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी भारतातील घडामोडींविषयी प्रश्न विचारले व गांधी यांनी भारतातील हुकूमशाही, असंवैधानिक कार्यपद्धती, महाराष्ट्र-हरयाणाच्या निवडणुकीत झालेले घोटाळे यावर परखड भाष्य करताच येथे भाजप भक्तांच्या पोटात मळमळ सुरू झाली. परदेशी भूमीवर जाऊन देशातील घडामोडींवर तक्रार करणे योग्य नाही, असा गळा भाजपने काढला. पण असा गळा परदेशात काढण्याची परंपरा नरेंद्र मोदी यांनीच सुरू केली. दुसरे असे की, एखाद्या देशात स्वातंत्र्य, लोकशाही धोक्यात येते तेव्हा लोकशाहीवादी व मानवतावादी नेते परदेशात जाऊन एक भूमिका मांडतात आणि मदतही घेतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी परदेशी शक्तीची मदत घेतली व त्यासाठी ते जर्मनीत जाऊन हिटलरलाही भेटले. त्याच नेताजींचा भव्य पुतळा मोदी यांनी दिल्लीत राजपथावर उभा केला आहे. राहुल गांधी अमेरिकेत आहेत व तेथील जनता सर्व पन्नास राज्यांत प्रे. ट्रम्प यांच्या हुकूमशाहीविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. न्यूयॉर्क-वॉशिंग्टनसह अनेक राज्यांत लोकांनी एकत्र येऊन मोर्चे काढले. ट्रम्प यांची मनमानी व राष्ट्रविरोधी धोरणांचा निषेध केला. प्रे. ट्रम्प हे लोकशाही मार्गाने निवडून आले व आता ‘बादशाही’ पद्धतीने कारभार करीत आहेत. ‘आम्हाला प्रे. ट्रम्प यांची राजेशाही मान्य नाही. ट्रम्प चालते व्हा’ अशा घोषणा आंदोलक देत आहेत. आंदोलकांनी ‘व्हाईट हाऊस’ आणि अमेरिकन संसदेला घेराव घातला. आंदोलकांचे नेतृत्व हीदर डन या करीत आहेत. त्या सांगतात, ‘आमचे आंदोलन शांततापूर्ण आहे. कोणाचा अवमान करणे, नुकसान करणे हा आमचा हेतू नाही. देशाला एकसंध ठेवणे आणि संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे म्हणणे आहे.’ याचा अर्थ प्रे. ट्रम्प हे मनमानी करीत आहेत. थापा मारून लोकांना फसवत आहेत. ट्रम्प स्वतः व्यापारी आहेत व त्यांना

राजेशाही पद्धतीने जगण्याचा

छंद आहे. राष्ट्रवाद, गरीबांचे कल्याण यावर भाषणे झोडायची व नेमके त्याच्या विरुद्ध वागायचे. आपल्या गोतावळय़ातील दलाल आणि उद्योगपती दोस्तांना मदत व्हावी हेच प्रे. ट्रम्प यांचे धोरण आहे. ट्रम्प सरकारच्या हुकूमशाही वृत्तीपासून देशाच्या लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली. प्रे. ट्रम्प हे जगाची कोतवाली करतात. इतर देशांतील राष्ट्रप्रमुखांना सल्ला देतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याच अमेरिकेत सध्या नागरी अराजक माजले आहे. भारतात जीएसटी, नोटाबंदी अशा धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली तशी प्रे. ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धोरणामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. त्यामुळे शेअर बाजार कोसळला. बेरोजगारी वाढली. सरकारी नोकऱयांत कपात झाली. भारताप्रमाणेच अमेरिकेतही नागरी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन सुरू आहे व मानवी हक्कांबाबत सावळागोंधळ आहे. प्रे. ट्रम्प व उद्योगपती मस्क या दोघांनी मिळून अमेरिकेची प्र्रतिष्ठा धुळीस मिळवली. मस्क यांच्यावर लोकांचा संताप आहे व मस्क यांच्या ‘टेस्ला’ गाड्यांच्या  शोरूमलाही लोकांनी लक्ष्य केले. प्रे. ट्रम्प हे अमेरिकन जनतेला नकोसे झाले आहेत. जे अमेरिकेत तेच भारतात चालले आहे. सत्ताधारी भाजपचे खासदार हे उघडपणे सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर हल्ले करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे. माजी निवडणूक आयुक्तांचा उल्लेख ‘आपण मुस्लिमांचे आयुक्त होतात…’ असा करणे धक्कादायक व निर्लज्जपणाचे आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण देशाला विघटनाकडे ढकलत आहे. अमेरिकेत स्वातंत्र्य आणि लोकशाही रक्षणासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे आणि त्याचे स्वागतच केले पाहिजे, पण भारतात काय चित्र आहे? येथे होळी, रामनवमीला मशिदींसमोर नाचण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरवले जाते व त्यामागे सत्ताधाऱयांची प्रेरणा असते. गरिबी कमी केली असे मोदी सरकार सांगते. मग 80 कोटी लोकांना पाच-दहा किलो फुकट धान्य का दिले जात आहे व महिलांच्या खात्यावर निवडणुकीच्या तोंडावर

हजार-पाचशे रुपये

का जमा केले जात आहेत? याचे उत्तर आज भाजप प्रवक्त्यांकडे नाही. हिंदू-मुसलमानांत भांडणे लावून दोघांत कायम तणाव ठेवायचा हे त्यांचे सरकारी धोरण आहे. प्रे. ट्रम्प अमेरिकेत वेगळय़ा पद्धतीने हाच मार्ग अवलंबीत आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात 50 राज्यांत आंदोलन उभे राहिले आहे व भारतात किमान 50 कोटी लोकांना धर्माची अफू पाजून ‘गुंग’ केले गेले आहे. ट्रम्प स्वतःला महासत्ताधीश मानतात, तर मोदी हे विश्वगुरू आहेत असा डंका त्यांचे भक्त पिटत आहेत. मोदी यांचाही थाट राजेशाही आहे व हिटलरी वृत्तीने त्यांचा कारभार सुरू आहे. मोदी यांच्या दिमतीला 20 हजार कोटींचे शाही विमान आहे व ते स्वतःला फकीर मानतात हे आश्चर्यकारक आहे. अमेरिकेतील आंदोलकांचे म्हणणे आहे की, ‘अमेरिकेचा कुणीही राजा नाही.’ भारतात मोदी हे देवाचे अवतार आहेत, असे त्यांचे भक्त सांगत असतात. त्यामुळे देवाच्या अवताराविरुद्ध आंदोलन करणे म्हणजे धर्मद्रोह आणि राजद्रोहच ठरतो. प्रे ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन करणारे अमेरिकेचे आंदोलनकर्ते म्हणतात, ‘येथे हिटलरशाही आणि हुकूमशाही चालणार नाही.’ अनेक आबालवृद्ध हातात निषेधाचे फलक घेऊन ट्रम्पविरोधी आंदोलनात उतरले आहेत. ते आजी-आजोबा जगाला ओरडून सांगत आहेत, ‘आम्ही मोठ्या संकटात असून आई-वडिलांनी हिटलरच्या उदयाबाबत ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळत्या जुळत्या आहेत. ट्रम्प यांनी सत्ता टिकवण्यासाठी स्वतःच्या देशातच फूट पाडली आहे.’ भारतात तरी यापेक्षा वेगळे काय घडत आहे? भारतातही फूट पाडली गेली आहे. मोदी यांच्या कारभाराची तुलना हिटलरशीच केली जाते. प्रे. ट्रम्पही हिटलर अंगात संचारल्याप्रमाणे वागत आहेत. प्रे. ट्रम्प यांना अमेरिकेच्या जनतेने हिटलर ठरवले आहे. पंतप्रधान मोदी हे प्रे. ट्रम्प यांचे भक्त आहेत. हिटलरला विश्वविजेता व्हायचे होते. मोदी हे स्वयंभू विश्वगुरू म्हणून घोषित झालेच आहेत. थोडक्यात, हिटलर जिवंत आहे!