‘नरकातला स्वर्ग’… 17 मे रोजी प्रकाशित होणार संजय राऊत यांचे पुस्तक; उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह जावेद अख्तर यांची विशेष उपस्थिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख समोर आली आहे. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे शनिवार, 17 मे रोजी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तर कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक चर्चेत असण्याचे एक कारण असे की ‘ईडी’ने संजय राऊत यांना राजकीय दबावाखाली अटक केली व शंभर दिवसांवर तुरुंगात डांबले. तुरुंगातील अनुभवांवरील हे पुस्तक आहे. या पुस्तकातून सरकार, ईडी, तपास यंत्रणा साऱ्यांचीच पोलखोल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या पुस्तकाची वाचक चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत.