
UPSC परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या निकालात शक्ती दुबे, हर्षिता गोयल, डोंगरे अर्चित पराग, शाह मार्गी चिराग, आकाश गर्ग हे टॉपर ठरले आहेत.
सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) एकूण 180 पदे भरली जातील. यापैकी 73 पदे अनारक्षितांसाठी, 24 एससीसाठी, 13 एसटीसाठी, 52 ओबीसीसाठी आणि 18 ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी राखीव आहेत. यावर्षी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलिस सेवेसाठी 150 पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 60 पदे अनारक्षित आहेत, 23 एससी, 10 एसटी, 42 ओबीसी आणि 15 ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत. यावेळी, भारतीय परराष्ट्र सेवा अंतर्गत भारताच्या परराष्ट्र धोरण आणि राजनैतिक कूटनीतिशी संबंधित एकूण 55 पदे भरली जातील. ज्यामध्ये 23 अनारक्षित, 9 एससी, 5 एसटी, 13 ओबीसी आणि 5 ईडब्ल्यूएस श्रेणीतील पदांचा समावेश आहे.
अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. तर तो महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चितने देशात तिसरा क्रमांक मिळवत महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही चांगली कामगिरी केली आहे.
युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली चमक दाखवून दिली आहे.