चीनचा अमेरिकेला पुन्हा ‘दे धक्का’! टॅरिफ वॉरनंतर बोईंग खरेदीस नकार, हिंदुस्थानचा फायदा होण्याची शक्यता

अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेले टॅरिफ वॉर आता शिगेला पोहचले आहे. या दोघांमधील या टॅरिफ वॉरचा हिंदुस्थानला फायदा होण्याची शक्यता आहे. या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकेकडून बोईंग कंपनीचे विमान घेण्याचे नाकारले आहे. त्यामुळे आता हिंदुस्थान बोईंग खरेदीबाबत पुढाकार घेऊ शकतो. एअर इंडिया लिमिटेड बोईंग कंपनीकडून विमान खरेदी करण्याची योजना आखत आहे.

टाटा समूहाच्या मालकीच्या या विमान कंपनीला नवीन विमानांची तातडीने गरज आहे. ती बोईंगकडून जेट विमाने खरेदी करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी बोईंगशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने ही विमाने चिनी विमान कंपन्यांसाठी बनवली होती. मात्र, टॅरिफ वॉरमुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. यामुळे चीनने आता विमान खेरदीस नकार दिला आहे. चीनला देण्यासाठी 10 बोईंग विमाने पूर्णपणे तयार आहेत. आता चीनने बोईंग विमाने घेण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेला मोठा धक्का बसू शक्याता आहे. मात्र, हिंदुस्थान आणि मलेशियामुळे अमेरिकेचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानसह मलेशियादेखील बोईंग विमान खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे.

एअर इंडिया 30 ते 40 वाइड बॉडी विमाने खरेदी करू शकते. याबाबत बोईंग आणि एअरबसशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये एअरबस ए 350 आणि बोईंग 777 एक्स मॉडेल्सचा समावेश आहे. बोईंग कंपनीच्या विमानांच्या किमती त्यांच्या आकारावर आणि सुविधांवर अवलंबून असतात. एका बोईंग विमानाची किंमत 4000 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. तर बोईंग 737 मॅक्सची किंमत 900 ते 1100 कोटी रुपयांपर्यंत आहे. हे एक प्रवासी विमान आहे, जे कमी अंतराच्या उड्डाणांसाठी वापरले जाते. बोईंग 777 ची किंमत 2500 कोटी ते 3500 कोटी रुपयांपर्यंत आहे. हे एक मोठ्या आकाराचे विमान आहे. त्यात 300 ते 400 प्रवासी बसू शकतात.