आमच्याकडे 237 आमदारांचे बहुमत; ज्यांना जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे! पालकमंत्री अतुल सावे यांनाही कंठ फुटला

महायुतीच्या त्यातही मिंध्यांच्या आमदारांनी दौऱ्याकडे पाठ फिरवल्यामुळे संतापलेले पालकमंत्री अतुल सावे यांनी ‘आमच्याकडे 237 आमदारांचे बहुमत आहे. ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे’ अशा शब्दांत मिंध्यांना सुनावले. सावे यांच्या या धमकीमुळे महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तांडा वस्तीच्या कामांना दिलेल्या स्थगितीनंतर पालकमंत्री अतुल सावे नांदेडात आले, पण महायुतीच्या आमदारांनी सावे यांच्या दौऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ खासदार अजित गोपछडे आणि भाजपचे सटरफटर पदाधिकारी सावेंच्या दौऱ्यात उपस्थित होते.

जिल्ह्यातील तांडावस्तीची कामे देताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेण्यातआले नाही, अशी तक्रार भाजपचे आमदार तुषार राठोड, मिंधे गटाचे बाबूराव कदम, भीमराव केराम आदींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेली 7.35 कोटींची कामे स्थगित केली. मुख्यमंत्र्यांनी दणका दिल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे हे आज नांदेडात नियोजन समितीच्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी आले होते. खासदार अजित गोपछडे आणि भाजपचे किरकोळ पदाधिकारी वगळता कुणीही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते.

भाजपचे ‘आदर्श’ खासदार अशोक चव्हाण यांनीही पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. आमदार तुषार राठोड, भीमराव केराम, बाबूराव कदम कोहळीकर, बालाजी कल्याणकर, आनंदराव बोंढारकर, प्रताप पाटील चिखलीकर, जितेश अंतापूरकर हे सावे यांच्या बैठकांकडे फिरकलेही नाहीत. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अतुल सावे यांनी तांडावस्तीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आला होता, असे सांगितले. आमदारांनी शिफारस केल्यानंतरच हा प्रस्ताव माझ्याकडे आला. त्यानंतर तो मंजूर करण्यात आला. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली असल्याची सारवासारव सावे यांनी केली. आमदार बाबूराव कोहळीकर यांनी आपला निषेध केला आहे… असे विचारले असता सावे यांनी ‘आमच्याकडे 237 आमदारांचे प्रचंड बहुमत आहे. ज्यांना कुठे जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे आम्हाला काहीही फरक पडणार नाही…’ असा त्रागा केला.