
>> बद्रीनाथ खंडागळे
जायकवाडीच्या 280 किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याखाली यंदा 3 जिल्ह्यांतील 1 लाख 42 हजार हेक्टर शेतजमिनींचे सिंचन झाले. यापोटी 2 कोटी 73 लाख 16 हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना व अहिल्यानगर या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांसह पैठण, वाळूज व चिकलठाणा या 3 एमआयडीसीतील शेकडो कंपन्यांकडून बिगर सिंचन 65 कोटी 19 लाख 40 हजार रुपयांची पाणीपट्टीची रक्कम प्राप्त झाली. प्रकल्पाच्या 55 वर्षांच्या इतिहासात एकाच आर्थिक वर्षात 67 कोटी 92 लाख 56 हजार रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची विक्रमी कामगिरी पाटबंधारे विभागाने केली आहे.
याबाबत जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी माहिती दिली. त्यानुसार नाथसागरात यावर्षी पाणीपट्टी वसुलीची उद्दिष्टपूर्ती करताना नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. जलसंपदा विभागातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पथके तयार केली. शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्यानुसार कालव्यातून भरपूर पाणीपाळ्या सोडण्यात आल्या. पिकांसाठी हे फायदेशीर ठरल्यामुळे शेतकऱ्यांनीही पाणीपट्टी थकवली नाही. २८० किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यातून १ लाख ४२ हजार हेक्टर शेतजमिनींचे सिंचन झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी या जिल्ह्यांतील १ लाख ३० हजार लाभार्थी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीची प्रक्रिया सोपी झाली, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे प्रदीप बोरुडे यांनी दिली.
शेकडो कंपन्या, साखर कारखाने अन् ५० लाख लोकांना रोजचा पाणीपुरवठा…
या पार्श्वभूमीवर बिगरसिंचन पाणीपट्टी वसुली करतानाही सातत्य कायम ठेवले. पैठण, चिकलठाणा व वाळूज या तिन्ही एमआयडीसीतील शेकडो कंपन्या नाथसागरच्या पाणीपुरवठ्यावरच चालू आहेत. तसेच गंगापूर, कायगाव, भेंडाळा व बाबरगाव येथील कंपन्या, संत एकनाथ साखर कारखाना (पैठण), समर्थ साखर कारखाना (अंबड, जि. जालना) व अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगामाई इंडस्ट्रीज (प्रा.लि. बाभुळगाव) यांनाही जायकवाडीच्या डाव्या कालव्यातूनच पाणी दिले जाते. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना व नगर या ३ जिल्ह्यांतील शहरांसह जवळपास ३०० छोट्या-मोठ्या गावांना जायकवाडी जलाशयातून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे.
गतवर्षी 12 टक्के, तर यंदा 44 टक्के पाणीसाठा…
जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात गतवर्षीपेक्षा यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी १२.४८ टक्के जलसाठा वापरायोग्य शिल्लक होता. आज २१ एप्रिल रोजी रोजी धरणात ४४.५२ टक्के पाणीसाठा आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून प्रतिसेकंद २ हजार १५० क्युसेस याप्रमाणे उन्हाळी पिकांसाठी तिसरी पाणीपाळी सोडण्यात आलेली पाणीपट्टीपोटी ६५ कोटी १९ लाख ४० हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे, असेही कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी स्पष्ट केले. तथापि, आणखी दीड महिना उपलब्ध जलसाठ्यातूनच सिंचन व बिगर सिंचनासाठी मोठ्या काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. यासाठी पाटबंधारे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.