वसईत सोनचाफा बोलेना, मोगरा फुलेना; सोनचाफा, मोगरा, सायली, गुलाब आवक घटली, पण दर वधारले

मुंबईला फुले आणि भाजीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यात वाढत्या शहरीकरणामुळे बागायतीचे क्षेत्र घटू लागले आहे. त्याचा फटका फुल उत्पादनाला बसू लागला आहे. या मोसमात फुलांचे उत्पादन घटल्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. आठ ते दहा लाख इतके उत्पादन होणारा सोनचाफा आता अवघ्या 25 ते 30 हजारांवर आला आहे. त्यामुळे वसईत सोनचाफा बोलेना, मोगरा फुलेना. मात्र सध्या चैत्रातील यात्रा सुरू असल्याने वसईच्या सुगंधी फुलांना चांगलीच मागणी असून ही फुले ‘भाव’ खात आहेत.

वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली जाते. भाजीपाल्याबरोबरच मुंबईला फुलांचा पुरवठा करणारा तालुका अशी वसईची ओळख आहे. मात्र काही वर्षांपासून मुंबईच्या बाजारात मोठी मागणी असलेल्या मोगऱ्याचे उत्पादन कमी झाले. त्याची जागा सोनचाफ्याने घेतली. येथील बागायतदार आठ ते दहा लाख इतक्या सोनचाफ्याच्या फुलांचे उत्पादन घेत होते. मात्र यंदाच्या मोसमात हे उत्पादन अवघ्या 25 ते 30 हजारांवर आल्याने शेतकरी बागायतदार चिंतेत आहेत.

यापूर्वी वसईत मोगऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते. परंतु आता मोगऱ्याऐवजी शेतकरी सोनचाफ्याच्या लागवडीकडे वळले आहेत. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून चाफ्याची आवक घटली आहे. ती कशामुळे घटली, वातावरणातील बदलामुळे की पाण्यामुळे, यासाठी आम्ही कृषी संशोधकांची मदत घेत आहोत. एकीकडे मजुरी वाढली असतानाच उत्पन्न घटत चालल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
सुभाष भट्टे, – वसंतराव नाईक फुलशेती पुरस्कारप्राप्त शेतकरी.