अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण; मार्गावर आठ स्टेशन उभारणार; नेवाशातील चार स्टेशनचा समावेश

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या 85 किलोमीटर अंतर नव्याने सुरू होत असलेल्या नियोजित रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अंतिम करण्यात आले आहे. या मार्गावर आठ स्टेशन उभारण्यात येणार आहेत. नेवासा तालुक्यात चार स्टेशनमध्ये श्री क्षेत्र देवगड व शनिशिंगणापूर या तीर्थस्थळांचा प्रामुख्याने समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वेसंदर्भात आयोजित बैठकीत नव्याने सुरू होत असलेल्या नियोजित रेल्वेमार्गाचा अंतिम सर्वेक्षण आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी खासदार भागवत कराड, दक्षिण रेल्वे नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्यासह सर्व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

या रेल्वेमार्गासाठी तीन सर्वेक्षण झाली, त्यापैकी एक सर्वेक्षण फायनल करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. चार वर्षांपूर्वी या मार्गाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून सर्वेक्षण चालू होते. आता हा मार्ग निश्चित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली. छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या मार्गावर आठ स्टेशन उभारण्यात येणार आहेत. संभाजीनगर स्टेशनवर 16 भोगीची पिटल लाईनऐवजी 18 भोगीची पीटल लाईन करण्यात येणार आहे. संभाजीनगर ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावर पांढरीपूल, डोंगरगण हे डोंगर भाग असल्याने येथे टनेल न उभारताही लाईन वांबोरीमार्गे वळवण्यात येणार आहे. या मार्गावर आठ स्टेशन समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर, तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर, उस्थळ दुमाला, नेवासा, तीर्थक्षेत्र देवगड, गंगापूर, येसगाव, आंबेगाव, शरणापूर ही स्टेशन असणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री क्षेत्र देवगड व शनिशिंगणापूर या तीर्थस्थळांना स्टेशन जोडले जाणार असून, या रेल्वेमुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर ही दोन शहरे रेल्वेने जोडली जाणार आहेत. याचा मोठा फायदा नागरिकांना होणार आहे. पुढील काही महिन्यांत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊन रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे धावणार
राहुरी-शनिशिंगणापूर या २३ किलोमीटर अंतरावर नवीन सिंगल ब्रॉडगेट लाईन रेल्वेमार्गाचे नोव्हेंबर २०२३ साली सर्वेक्षण करण्यात आले. तसेच या मार्गावरील माती, दगड परीक्षणसुद्धा करण्यात आले. रेल्वे लाईनमार्ग निश्चित करण्यात आला असून, काही महिन्यांत भूमी अधिग्रहणसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. अहिल्यानगर – छत्रपती संभाजीगर व राहुरी – शनिशिंगणापूर हे दोन मार्ग रेल्वेने जोडले जाणार असल्याने शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्राला आगामी काळात विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गासाठी सन २००९ ते २०१४ या काळात मी दिल्लीला पाठपुरावा केला. तीन-चार सर्वेक्षण झाली असली, तरी केंद्रीय रेल्वे बोर्ड यासाठी एक पॅरामीटर ठरवते. त्यानुसार या रेल्वे लाईनला फायदा किती व तोटा किती, यावर निर्णय होत असे. त्यामुळे तीर्थक्षेत्र ठिकाणे लाईनमध्ये येत असल्याने भाविकांच्या दृष्टीने हे योग्य ठरेल व उत्पन्न वाढेल.
-भाऊसाहेब वाकचौरे, खासदार, शिर्डी मतदारसंघ.