22 हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे ‘माविम’ने केले फस्त, गोरगरीब मुलांसाठी आलेले कोट्यवधी रुपये कुठे जिरले ?

सचिन जगताप, पालघर
यंदाचे शैक्षणिक वर्ष संपले तरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघरच्या जिल्हा परिषद शाळांमधील 22 हजार विद्यार्थ्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाने गणवेशाचे वाटपच केलेले नाही. त्यामुळे पालघरमध्ये मोठा गणवेश घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून माविमंने हा निधी फस्त केला की दुसरीकडे कुठे खर्च केला, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश दिला जाईल, अशी सरकारने राणाभिमदेवी थाटात घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत एक गणवेश आणि महिला विकास आर्थिक महामंडळ (माविम) तर्फे एक गणवेश दिला जातो. जिल्हा परिषदेकडून विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात आला. मात्र माविमंमार्फत दिले जाणारे गणवेश गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळालेच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर अख्खे शैक्षणिक वर्ष काढावे लागले. एका गणवेशासाठी 200 ते 400 रुपये हा दर सरकारने ठरवला आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 22 हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. मग त्यांच्या गणवेशाचे कोट्यवधी रुपये गेले कुठे, अशी चर्चा पालघर जिल्ह्यात सुरू झाली आहे. .

ही बघा बनवाबनवी
माविमंमार्फत आम्ही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले आहेत. अतिक शेख (जिल्हा व्यवस्थापक माविमं)

माविमंमार्फत आम्ही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले आहेत. अतिक शेख (जिल्हा व्यवस्थापक माविमं)
जिल्हा परिषदेने गणवेश दिले. माविमने गणवेश दिलेच नाही. – सोनाली मातेकर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग)

पालघर जिल्ह्यातील 2 हजार 120 जिल्हा परिषद शाळांमध्ये 1 लाख 60 हजार 917 विद्यार्थ्यांना गणवेश देणे अपेक्षित होते. त्यातील 1 लाख 38 हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले.महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 22 हजार 855 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणे अपेक्षित होते. मात्र एकाही विद्यार्थ्याला माविमंमार्फत गणवेश मिळालेले नाहीत.

गणवेशाचे वाटप केले जाईल असे माविमंकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सांगण्यात येत आहे. मात्र शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना गणवेश का मिळाले नाहीत? या गणवेशाचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे फस्त झाला, असा सवाल पालकांनी विचारला आहे.

मर्जीतल्या ठेकेदाराला लाभ मिळावा म्हणून
हे कारस्थान करून विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करायलाच हवी.
सुनील भुसारा, (माजी आमदार, विक्रमगड विधानसभा)

येथे गणवेशाचे वाटपच झाले नाही
डहाणू तालुका : 10 हजार 985 विद्यार्थी
वसई तालुका : 7 हजार 614 विद्यार्थी
वाडा तालुका : 2 हजार 19 विद्यार्थी
जव्हार तालुका : 369 विद्यार्थी
मोखाडा तालुका : 377 विद्यार्थी
तलासरी तालुका : 229 विद्यार्थी