पावसाळ्यापर्यंत उजनीचे पाणी आरक्षित ठेवावे; कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची मागणी

सध्या उजनी धरणातील पाण्याने एप्रिल महिन्यातच तळ गाठला असून, उन्हाळ्याची तीव्रता भयानक जाणवू लागली आहे. चाराटंचाई निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना पाईपलाईन वाढवावी लागत आहे. दिवसेंदिवस पाण्याचं फार मोठं संकट निर्माण होऊ लागले आहे. उजनी बॅक वॉटरवरती इंदापूर शहरासह गावोगावच्या नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. उजनी धरणासाठी बॅकवॉटरवरील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर शेतकरी व जनतेसाठी आगामी पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केली आहे.

एकूण पाणीपातळीः ४९१.०२५ मीटर एकूण पाणीसाठा १८०१.८३ घनमीटर (६३.६२ टीएमसी) उपयुक्त जलसाठाः (-०.९८) घनमीटर (०.०३ टीएमसी) एकूण पाणी साठवण क्षमता : १२३ टीएमसी सध्याची टक्केवारी (०.०६ टक्के) आहे. उजनी धरण बॅकवॉटरवरती पिण्याच्या पिण्याच्या अनेक नळ पाणीपुरवठा योजनांबरोबर, आगामी काळात उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पाणी आरक्षित ठेवण्यात यावे. आगामी काळात उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे मत भरत शहा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे मुकुंद शहा, सामाजिक कार्यकर्ते बापू जामदार, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, शकीलभाई सय्यद, गणेश महाजनसह इतर मान्यवर उपस्थित होते.