
पिंपरी शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘कोयता गँग’ने अक्षरशः हैदोस घातला आहे. गेल्या पावणेचार महिन्यांत शहरात अशा तब्बल 22 घटना घडल्या आहेत. भोसरी येथे अल्पवयीन मुलासह दोनजणांनी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या 12 कार आणि एका टेम्पोची दगड आणि कोयत्याने तोडफोड केली. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सकाळी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. करण बाळू ससाणे (वय 20, रा. फुलेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अमरसिंग मनबहादूर थापा (वय 47, रा. सुखवानी बाग हौसिंग सोसायटी, आदिनाथनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. थापा हे सुखवानी बाग हौसिंग सोसायटीत रखवालदार आहेत.
गव्हाणे वस्ती आदिनाथनगर रस्त्यावर सुखवानी बाग सोसायटी आहे. सोसायटीतील काही नागरिकांसह आजूबाजूला राहणारे रहिवाशी रात्रीच्या वेळी आपली वाहने या रस्त्याकडेला उभी करतात. रविवारीही नेहमीप्रमाणे रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याकडेला उभी केली होती. मध्यरात्री एक ते सव्वाएकच्या सुमारास आरोपी करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हातात कोयता घेऊन आले, दगड आणि कोयत्याने त्यांनी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या दिसेल त्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी 12 कार आणि एका टेम्पोच्या काचा फोडल्या. थापा यांनी आरडाओरडा करीत आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोर्पीनी त्यांच्या दिशेने वीट फेकून मारली. सुदैवाने थापा बाजूला सरकल्याने बचावले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
कोयता बाळगणारा जेरबंद
कोयता बाळगल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी तरुणाला अटक केली. कृष्णा अजय आल्हाट (वय २०, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर भुरे यांनी फिर्याद दिली आहे. कृष्णा हा कोयता घेऊन नेहरूनगर येथील एचए मैदानानजीक आला असल्याची माहिती संत तुकारामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कृष्णा याला ताब्यात घेतले. महिला पोलीस नाईक वाघमारे तपास करीत आहेत.
रहिवाशांनी तत्काळ हा प्रकार भोसरी
पोलिसांना कळवला. फौजदार सुहास खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. सकाळी गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत की नाही, याबाबत त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. याबाबत चौकशी केली जात आहे, असे फौजदार खाडे यांनी सांगितले.
गेल्या पावणेचार महिन्यांतील घटना
1 जानेवारी – आळंदी येथे दोन समाजकंटकांकडून पाच वाहनांची तोडफोड
1 जानेवारी भोसरीत सखुबाई गवळी उद्यानाजवळ तीन वाहनांची तोडफोड
3 जानवारी दिघीत हप्ता दिला नाही म्हणून तीन वाहनांची तोडफोड
4 जानेवारी जुनी सांगवीत दुचाकीला कट लागल्याने दगडफेक करून दोन वाहनांचे नुकसान
9 फेब्रुवारी चिखलीत सराईत अल्पवयीन मुलाकडून १२ वाहनांची तोडफोड
15फेब्रुवारी दापोडीत सराईत गुन्हेगारांसह तिघांकडून कोयत्याने दोन रिक्षांसह सहा दुचाकींची तोडफोड
4 मार्च – हिंजवडीत तडीपार गुंडाकडून किराणा दुकानाची कोयत्याने तोडफोड रासे येथे बिलावरून वाद घालत हॉटेलमध्ये तोडफोड
9 मार्च – पिंपरीगावात घरात घुसून टीव्ही, शोकेसची तोडफोड
12 मार्च – चिंचवड केएसबी चौकात टोळक्याकडून १२ कारची तोडफोड
14 मार्च – चिखलीत दोन तरुणांना मारहाण करत कारची तोडफोड
14 मार्च – वाकडमध्ये गणेशोत्सवातील भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार
16 मार्च- बोपखेलमध्ये भांडण सोडविले म्हणून तरुणावर कोयत्याने वार
17 मार्च -वाकड येथे गणेशोत्सवातील भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार
24 मार्च – पिंपरीत अल्पवयीन टोळक्याकडून कोयत्याने टपरीची तोडफोड
28 मार्च- बिजलीनगर येथे टोळक्याकडून कोयता, दांडक्याने हातगाडींची तोडफोड
1 एप्रिल – कोयाळीत गावातील भाई आहे म्हणत कोयत्याच्या धाकाने पाच हजार लुबाडले
5 एप्रिल -रहाटणीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला
8 एप्रिल- निघोजे येथे दारूदुकानदाराकडून खंडणीसाठी कोयता हवेत फिरवत गुंडाची दहशत
10 एप्रिल – दापोडीत डॉन-भाई यांची कोयते हवेत फिरवत दहशत
13 एप्रिल – चिखलीत दोन गटांत धुमश्चक्री एकमेकांवर कोयत्याने वार
17 एप्रिल – चिखलीत हॉटेलची तोडफोड करीत कोयत्याने वार