ठाण्यात आधीच उकाडा, त्यात सहा तास वीज गुल, कासारवडवली भागातील रहिवाशांचे हाल; जेसीबीने केबल तोडली आणि घात झाला

भयंकर उकाड्याने ठाणेकर त्रस्त असतानाच आज सकाळी कासारवडवली भागातील विविध सोसायट्यांमध्ये तब्बल सहा तास वीज गुल झाली. ओवळा नाका येथे जेसीबीचा धक्का लागून महावितरणची केबल तुटल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र त्यामुळे संपूर्ण दिवसभर घोडबंदरवासीयांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांच्या संतापाचा पाराही वाढला आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने ओवळा नाका येथे अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याच भागात आरएमसी प्लॅण्टदेखील असून ठेकेदारामार्फत खोदकाम करण्याचे काम आज सुरू होते. सकाळच्या सुमारास जेसीबीचा धक्का लागल्याने जमिनीखालील महावितरणची मोठी केबल तुटली आणि परिसरातील वीज गायब झाली. या बिघाडामुळे अशोक स्मृती, हार्मोनी रेसिडन्सी, पुष्पांजली सोसायटी, होरिझन पाम, टीआरा सोसायटी अशा विविध भागांमध्ये सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

सोसायट्यांमधील बॅटरी बॅकअपही बंद
घोडबंदर रोडवरील कासारवडवली, ओवळा या भागात मोठमोठे टॉवर्स असून काही इमारतींमध्ये बॅकअप नसल्याने लिफ्ट बंद पडली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचे अतोनात हाल झाले, तर अनेकांच्या घरातील बॅटरी बॅकअपही बंद पडला. महावितरणची केबल तुटल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचा खर्च ठाणे महापालिका देणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.