
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाटय़ मंदिर सभागृहामध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्याला कलाकार म्हणून मोठे करणाऱ्या प्रेक्षकांचे अशोक सराफ यांनी आभार मानले. तसेच प्रेक्षकांना आनंद मिळतोय तोपर्यंत काम करत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर तर अनुष्का सरकटे हिने लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. मृण्मयी देशपांडे आणि मीरा जोशी यांच्या नृत्याने सोहळ्याला चार चाँद लावले.
या सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी चित्रपटांना आर्थिक पाठबळ देणार
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन 21 एप्रिल 1913 रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला 112 वर्षे पूर्ण झाली. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपताका महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा अॅड. आशीष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकार आर्थिक पाठबळ देणार असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले.