
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे कटरने तुकडे करणारा मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कुरुंदकरचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. गेली नऊ वर्षे हा खटला लढणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला. महाराष्ट्र पोलीस दलाला सर्वाधिक बदनाम करणाऱ्या या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात वकील आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
11 एप्रिल 2016 मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या डोक्यावर बॅटने घाव घालत निर्घृण हत्या केली. त्यानंतर कुरुंदकरने त्याचे मित्र महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना घरी बोलावले. या तिघांनी अश्विनीच्या मृतदेहाचे कटरने बारीक तुकडे करून तिच्या मृतदेहाची वसईच्या खाडीत विल्हेवाट लावली. अथक प्रयत्नानंतरही पोलिसांना अश्विनीचा मृतदेह सापडला नाही. अश्विनीच्या हत्याकांडाचा खटला पनवेल येथील सत्र न्यायालयात तब्बल 9 वर्षे चालला.
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह त्याचा खासगी चालक कुंदन भंडारी आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा मित्र महेश फळणीकर यांना पनवेलच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी 5 एप्रिल रोजी दोषी ठरवले होते. ज्या दिवशी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली त्याच तारखेला 11 एप्रिल रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र त्या दिवशी न्यायालयाने अश्विनी यांची कन्या सूची गोरे आणि वडील जयकुमार बिद्रे यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर सुनावणी करण्यात आली. आजोबा आणि नातीची मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची, तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षे तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली.
11 पैकी 10 गुह्यांत कुरुंदकर दोषी
न्यायालयाचे कामकाज आज सकाळी 11 वाजता सुरू झाले. तिन्ही आरोपींना तळोजा जेलमधून साडेअकराच्या दरम्यान न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर 11.35 वाजता आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले. आरोपी न्यायालयात आल्यानंतर अभय कुरुंदकर याला 11 पैकी 10 गुह्यांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सुनावण्यात आलेली सात वर्षांची शिक्षा ही त्यांच्या अटकेच्या तारखेपासून ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.