पत्नीने वार करण्यापूर्वी मिरची पावडर फेकली, माजी महासंचालकांचे हत्या प्रकरण

कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येमागे त्यांच्या पत्नीचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी यांनी चाकूने वार करण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली असल्याचे हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. संशयित म्हणून पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी बंगळुरूतील राहत्या घरी ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. ते 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. पोलिसांनी तपासासाठी ओम प्रकाश यांच्या पत्नीसह मुलगी क्रितीलाही ताब्यात घेतले आहे.

चौकशीनंतर सत्य समोर येईल – गृहमंत्री

माजी महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली असून त्यांची पत्नी पल्लवी यांनी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सविस्तर चौकशीनंतरच सत्य समोर येईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हत्येमागील कारणाबाबत त्यांना विचारले असता अधिकाऱ्याने अद्याप कोणतीही माहिती दिली नसल्याचे सांगत त्यांनी बोलणे टाळले.