
मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या माऱ्याने मुंबईकर हैराण झाले असताना वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, सध्या तरी पाणीकपातीचा कोणताही विचार नाही. मात्र, 15 मेपर्यंत तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल, असे जल अभियंता विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते; परंतु यंदा सातही धरणांत 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
…तर मुंबईकडे असेल जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी
राज्य सरकारने मुंबईला 2 लाख 30 हजार 500 मिलियन लिटर राखीव साठा तत्त्वतः उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्यावेळी पाणीसाठा अगदीच कमी होईल त्यावेळी राज्य सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून हा साठा घेण्यात येईल. हा राखीव साठा घेतला तर मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, याबाबतचा निर्णय मे महिन्याच्या पहिल्या किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात घेतला जाईल, असे जल अभियंता विभागाने सांगितले.
21 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा – 68,312
मोडक सागर – 29,268
तानसा – 33,131
मध्य वैतरणा – 66,494
भातसा – 1,99,854
विहार – 11,105
तुळशी – 3,190