कार्यसम्राट चषकावर जिया स्पोर्ट्स क्लबचे शिक्कामोर्तब

विभागातील अस्सल क्रिकेट संघांसाठी आयोजित कार्यसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेत संघमालक रमेश वांजळे यांच्या शाखा क्र. 64 मधील जिया स्पोर्ट्स क्लबने शाखा क्र. 71 च्या जुहू स्पोर्ट्स क्लबचा पराभव करीत जेतेपद पटकावले. या स्पर्धेत विभागातील 32 संघांनी सहभाग घेतला होता.

शिवसेना नेते, आमदार, विभागप्रमुख अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम यांच्या पुढाकाराने अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कार्यसम्राट चषकाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या जिया स्पोर्ट्स क्लबने जुहू स्पोर्ट्स क्लबचा सहज पराभव करीत एक लाख आणि झळाळता करंडक उंचावला. उपविजेत्यांना 50 हजारांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील एकमेव अर्धशतकासह 81 धावा आणि 6 विकेट टिपणारा आंबोली बॉइजचा रोहन साळंखे मालिकावीर ठरला. जिया स्पोर्टस्  क्लबचा प्रमय उत्कृष्ट गोलंदाज, तर आंबोली बॉईजचा शेरा हा स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरला. मुंबईच्या सोळा वर्षाखालील संघात निवड झालेल्या शिवगर्जना क्रिकेट संघाच्या विराज मोरेचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेला शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार हारून खान, एमसीएचे सदस्य निलेश भोसले, महिला विभाग संघटिका अनिता बागवे, चंद्रकांत शिंदे, ऋषी वैद्य, संतोष बडे,  निमित पांचाळ , अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत, विलेपार्ले समन्वयक नितीन डिचोलकर यांची उपस्थिती लाभली.

 पुढचा कार्यसम्राट चषक सुप्रिमो चषकासारखा दिमाखदार होणार

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आयोजक संजय कदम यांनी विभागातील क्रीडागुणांना संधी लाभावी म्हणून ही स्पर्धा पुढील वर्षापासून सुप्रिमो चषकासारखी भव्यदिव्य आयोजित करणार असल्याची घोषणा केली. या सोहळय़ाला वीणा टॉक, ज्योत्स्ना दिघे, विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया व स्वाती घोसाळकर उपस्थित होते.