पेठच्या बोरीचीबारी येथे हंडाभर पाण्यासाठी महिला विहिरीत उतरल्या, शिवसेना सरपंचाकडून टँकरने पुरवठा

जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने हंडाभर पाण्यासाठी खोल विहिरीत उतरून महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पेठ तालुक्यातील बोरीचीबारी येथील पाणीटंचाईचे भीषण वास्तव आणि सरकारचे अपयश चव्हाटय़ावर आले आहे. युवासेनेचे पदाधिकारी, येथील शिवसेना सरपंच मोहन कामडी यांनी ग्रामपंचायतीतर्फे टँकरने पाणी पुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.

पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या आदिवासी दुर्गम भागासह नाशिक जिह्यात गावोगावी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने मोठा गाजावाजा करून कोटय़वधी रुपयांच्या जलजीवन मिशनच्या योजनांना मंजुरी दिली. अपुरा निधी आणि भ्रष्ट कारभारामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. काम अपूर्ण राहिल्याने गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. यामुळे सरकारविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

योजनेचे काम अपूर्ण

पेठ तालुक्यात पुंभाळे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत पुंभाळे, मोहाचा पाडा, खडकी, गोहळस पाडा, बेरापाडा आणि बोरीचीबारी यांचा समावेश आहे. बोरीचीबारी येथील महिला पाण्यासाठी विहिरीत उतरल्या होत्या, अन्य पाडय़ावरील महिला जवळच्या विहिरीवरून पायपीट करून पाणी आणतात. या सर्व पाडय़ांसाठी सन 2023 मध्ये साडेचार कोटींची जलजीवन मिशनची योजना मंजूर झाली आहे. शिराळे धरणाजवळ विहीर खोदून प्रत्येक वाडीवर टाकीत पाणी टाकून घरोघरी नळाद्वारे पुरवठा केला जाणार आहे. मात्र, हे काम अपूर्ण राहिल्याने भीषण टंचाई निर्माण झाली.

तीन दिवसाआड दोनशे लिटर पाणी

पाणीटंचाईची दखल घेत शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे पदाधिकारी असलेले सरपंच मोहन कामडी यांनी बोरीचीबारी येथे सोमवारी टँकरने पाणी पुरवठा केला. तीन दिवसाआड ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक घराला दोनशे लिटर पाणी दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱयांना आली जाग

पेठ तालुक्यातील बोरीचीबारी येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागत आहे. पिण्यासाठी योग्य नसलेले हे गाळयुक्त पाणी धुणे, भांडय़ांसाठी वापरले जात आहे. महिला विहिरीत उतरल्याचे पह्टो, व्हिडीओ व्हायरल होताच सुस्त प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. या वाडीवर जावून अधिकाऱयांनी आढावा घेतला.