
आयपीएलने आपला महिनाभराचा आणि स्पर्धेचा अर्धा टप्पा गाठलाय. प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ खेळतील हे अद्याप अनिश्चित आहे. मात्र आठपैकी सहा सामने गमावून आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या धोनीच्या चेन्नई संघावर साखळीतच बाद होण्याचे संकट अधिक गहिरे झाले आहे. आयपीएलच्या गेल्या 17 वर्षांच्या इतिहासात सलग पाच पराभवांची नामुष्की सहन केल्यानंतरही डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान निर्माण केले होते. मात्र इतक्या पराभवानंतर कोणताही संघ विजेता ठरलेला नाही. आयपीएल निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेला धोनी यंदा आयपीएलमध्ये अनहोनीला होनी करणार का, असा प्रश्न आतापासून क्रिकेटप्रेमींच्या मनी पडला आहे.
चेन्नईसाठी गेला हंगामही फार वाईट होता आणि यंदाचा हंगामही आतापर्यंत अत्यंत वाईटच गेलाय. गेल्या हंगामात चेन्नईला सलग पराभवांना सामोरे जावे लागले नव्हते. मात्र यावेळी सलामीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ते सलग पाच सामन्यांत हरलेत. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात चेन्नई सलग चार सामनेही कधी हरली नव्हती. प्रथमच त्यांच्यावर चार नव्हे, तर पाच पराभवांची नामुष्की ओढवली आहे. इतक्या लाजिरवाण्या कामगिरीनंतरही धोनी चेन्नईला प्ले ऑफ गाठून देईल, असा विश्वास थालाच्या चाहत्यांना आहे. इतक्या मोठय़ा पराभवानंतर धोनीच्या व्रेझमध्ये किंवा चेन्नईबद्दल असलेल्या निष्ठsबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये तसूभरही प्रेम कमी झालेले नाही.
पराभवाचा चौकार आणि प्ले ऑफ
आयपीएलच्या झंझावातात काहीही अशक्य नाही. गेल्या 17 वर्षांचा आयपीएलचा इतिहास पाहिला तर अनेक संघ सलग चार सामने गमावल्यानंतरही आपल्या खेळात पुनरागमन करत प्ले ऑफच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. दिल्लीने पहिल्याच मोसमात हा पराक्रम केला होता. बंगळुरूने तर 2009, 2010, 2020-21 आणि 2024 या चार मोसमांत सलग चार पराभवांनंतरही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सनेही 2011च्या आयपीएलमध्ये सलग पाच पराभवांच्या धक्क्यानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची हिंमत दाखवली. आजवर सलग चार किंवा त्यापेक्षा अधिक पराभवानंतरही 11 संघांनी प्ले ऑफचे मिशन फत्ते केले होते. चार संघ अंतिम फेरीतही पोहोचले, पण एकही संघ विजेता होऊ शकलेला नाही. अशक्य असे काही नाही. धोनीला हा पराक्रम करण्याची संधी आहे.
धोनीला कोहलीच्या बंगळुरूचा करिष्मा दाखवावा लागेल
सर्वांना गेल्या आयपीएलमध्ये बंगळुरूची कामगिरी आठवत असेलच. गेल्या आयपीएलमध्ये आठपैकी सात सामन्यांत बंगळुरू हरली होती आणि त्यानंतरही त्यांनी पराभवाप्रमाणे विजयाचा अनोखा षटकार खेचत अनपेक्षितपणे नेट रनरेटमध्ये चेन्नईवर मात करत प्ले ऑफ गाठण्याचा करिष्मा केला होता. आयपीएल इतिहासात सलग सहा पराभवांनंतर सहा विजय मिळवणारा बंगळुरू हा एकमेव संघ आहे. म्हणजेच सलग सहा पराभवानंतरही बंगळुरू प्ले ऑफ गाठू शकते, तर धोनीच्या चेन्नईलाही तो चमत्कार करणे कठीण नाही. हा चमत्कार प्रत्यक्षात साकारण्यासाठी चेन्नईला आपल्या उर्वरित सहापैकी सहाही सामने जिंकावे लागतील. हे कठीण असले तरी अशक्य नाही. मात्र यादरम्यान एखादा पराभवही चेन्नईचा खेळ खल्लास करू शकतो.