कॉलेजसाठी रोज चार तास विमान प्रवास

जपानमधील पॉप गायिका आणि लोकप्रिय जपानी गर्ल ग्रुप सपुराजागा 46 ची सदस्य युजुकी नाकाशिमा ही कॉलेजला जाण्यासाठी दररोज जवळपास एक हजार किलोमीटरचा प्रवास विमानाने करतेय. दोन तास जायचे आणि दोन तास यायचे असे चार तास ती विमानाने प्रवास करत आहे. युजुकी नाकाशिमा ही विमान प्रवासासाठी दररोज 18 हजार रुपये खर्च करते. 22 वर्षांची युजुकी ही आपले शिक्षण आणि करीअर यामध्ये समतोल साधत आहे.

विद्यापीठात जाण्यासाठी नाकाशिमा दररोज सकाळी पाच वाजता उठते. टोकियोहून फुपुओकापर्यंतचा प्रवास ती विमानाने करते. हे विद्यापीठ एक हजार किलोमीटर दूर आहे. कॉलेजचा एकही क्लास बुडू नये, यासाठी युजुकीने रोजचे वेळापत्रक बनवले आहे. ती पाच वाजता उठून रोज सकाळी 6 वाजता विमानतळावर पोहोचते. सकाळी साडेनऊ वाजता फुपुओका विमानतळावर पोहोचते. त्यानंतर टॅक्सी किंवा बसने विद्यापीठात पोहोचते. चार वर्षांपासून ती रोज प्रवास करते.

नाकाशिमाने म्हटले की, तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणींना घाबरू नका. अडचणींवर मात करत स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आयुष्यातील प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो योग्य ठिकाणी खर्च करा, असेही ती म्हणाली. गायिकेच्या स्वप्नाला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये, याची ती विशेष काळजी घेते. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.