
ज्या वासंतिक शिबिराची पालक आणि विद्यार्थी गेले वर्षभर आतुरतेने वाट पाहतात ते श्री समर्थ व्यायाम मंदिराचे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर येत्या 2 ते 11 मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित केले जाणार आहे. गेली 100 वर्षे व्यायाय आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या श्री समर्थचे हे 51 वे वासंतिक शिबीर असून या शिबिरात 5 ते 85 वयोगटातील सुमारे 1 हजार शिबिरार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री समर्थचे सर्वेसर्वा आणि पद्मश्री उदय देशपांडे यांनी दिली. सकाळी 7 ते 8.30 आणि सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत होणाऱ्या शिबिरात संस्थेचे 200 हून अधिक राज्य आणि राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू शिबिरार्थींना विविध खेळांच्या मूलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतील. या शिबिराचे शुल्क रु. 500 आकारले जाणार असून इच्छुकांनी सहभागासाठी श्री समर्थच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे शिबीरप्रमुख सुनील सवने यांनी केले आहे.