
दिल्ली कोर्टात चेक बाऊन्सप्रकरणी सुनावणी सुरू असताना महिला न्यायाधीशाने आरोपीच्या विरोधात निकाल देताच संतापलेल्या आरोपी आणि त्याच्या वकिलाने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले. ‘‘तू है क्या चीज…तू बाहर मिल… देखते पैसे जिंदा घर जाती है,’’ असे म्हणत न्यायाधीशांना धमकी दिली. ही घटना 2 एप्रिल रोजी घडली. बार अँड बेंच वेबसाईटवरील माहितीनुसार, न्यायदंडाधिकारी शिवांगी मंगला यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि पुढील सुनावणीपर्यंत जामीनपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. निकाल विरोधात लागल्याने संतप्त झालेल्या आरोपीने महिला न्यायाधीशावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीने वकिलाला सांगितले की, ‘‘मला माझ्या बाजूने निकाल हवाय. काय वाट्टेल ते कर आणि निकाल माझ्या बाजूने करून दे.’’ एवढ्यावर आरोपी थांबला नाही. त्याने ‘‘बाहेर भेट. तू कशी जिवंत घरी जातेस ते बघतो.’’ अशा शब्दांत धमकावले.
घटनेमुळे मानसिक, शारीरिक त्रास
या घटनेमुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याचे न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी म्हटले. तसंच तू हे पद सोडून दे म्हणत त्यांना शिवीगाळ केली असे न्यायाधीश मंगला यांनी त्यांच्या आदेशात म्हटले. ‘तू आमच्या बाजूने निकाल दिला नाहीस तर तुझ्या विरोधात तक्रार दाखल करु, तू राजीनामा दे आणि या प्रकरणातून बाजूला हो’ अशीही धमकी दिली गेल्याचे त्यांनी म्हटले.
आरोपीच्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस
धमकी दिल्याबद्दल आणि छळ केल्याबद्दल आरोपींवर राष्ट्रीय महिला आयोगासमोर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपीच्या वकिलालाही कारणेदाखवा नोटीस बजावली. अॅड. अतुल कुमार असे त्या वकीलाचे नाव आहे.