मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कुटुंबियांसोबत बोलायचंय, दिल्ली उच्च न्यायालयात केली याचिका

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला त्याच्या कुटुंबियांशी बोलायचे असून त्यासाठी त्याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राणाने त्याच्या वकीलामार्फत 19 एप्रिलला ही याचिका दाखल केली असून आज या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. विशेष न्यायमूर्ती हरदीप कौर यांनी या याचिकेवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून 23 एप्रिलपर्यंत उत्तर मागवले आहे.

तहव्वूर राणाला 10 एप्रिल रोजी अमेरिकेतून दिल्लीत सुपर मिड-साईज बिझनेस जेट विमानाने आणण्यात आले. यानंतर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने राणाला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास राणाला घेऊन एनआयएच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. त्यानंतर त्याला पटियाळा कोर्टामध्ये हजर करण्यात आले. एनआयएने कोर्टाकडे 20 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने 18 दिवसांची कोठडी सुनावली होती.