बिल भरण्यावरून वाद टोकाला, ग्राहकाकडून हॉटेल मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला

बीडमधील हत्यासत्र थांबण्याचे नावच घेत नाही. बिल भरण्यावरून झालेल्या वादातून ग्राहकाने हॉटेल मालकासह त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी माजलगावमध्ये घडली. या हल्ल्यात हॉटेल मालकाचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव मार्गावरील नागडगाव पाटी कॉर्नर येथे महादेव गायकवाड यांचा गावरान ढाबा आहे. या ढाब्यावर शनिवारी सायंकाळी आरोपी रोहित शिवाजीराव थावरे हा मित्रांसोबत जेवायला आला होता. यावेळी हॉटेलच्या बिलावरून रोहितचा मालक आणि त्यांच्या मुलासोबत वाद झाला.

वाद विकोपाला गेला आणि रोहितने मित्रांसह मिळून महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत पिता-पुत्राला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सहा जणांविरेधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.