गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली शुद्ध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी नदीच्या पात्रात गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा होत असून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जर त्यांच्यावर कारवाई न केल्यास संबंधित मंत्री, अधिकारी यांच्यावर हक्कभंग मांडणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर, पैठण हिरपुडी येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपसाबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात 17 मार्च 2025 रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सभागृहात विषय उपस्थित केला म्हणून 24 तासासाठी निविदेला स्थगिती देऊन तात्काळ स्थगिती उठविली.

मात्र मूळ मुद्दा हा निविदेचा नसून गाळ मिश्रित वाळूच्या नावाखाली शुद्ध वाळू उपसा ठेकेदाराकडून केला जात असल्याचे दानवे म्हणाले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी व महसूल निरीक्षक हे वाळू निविदे संबंधी तक्रार असल्याचे सांगून ठेकेदारासोबत असलेले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मंत्री व सरकारची दिशाभूल करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

तसेच याप्रकरणी त्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व सभागृहाची, मंत्री महोदयांची दिशाभूल व चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तात्काळ कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तसेच या प्रकरणी कारवाईची माहिती सात दिवसांत विरोधी पक्षनेते कार्यालयाला सादर न केल्यास विरोधी पक्षनेता म्हणून सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान केल्याप्रकरणी संबंधित मंत्री, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर म. वि. प. नियम 241 अनव्ये हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचा इशारा दानवे यांनी दिला आहे.