
ईडी भाजपच्या निवडणूक शाखेसारखे काम करत आहे, अशी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. आज त्याने ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “ईडीने 2015 मध्ये हा खटला बंद केला होता. नंतर नवीन एफआयआर नोंदवण्यात आला. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बराच वेळ चौकशी करण्यात आली.”
भूपेश बघेल म्हणाले की, “आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे आरोपपत्राची माहिती मिळाली. ईडीने कोणालाही नोटीसही दिली नाही. कंपनीच्या कोणत्याही संचालकांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंह यांच्यापर्यंतच्या काँग्रेस सरकारांनी देशासाठी अनेक संस्था निर्माण केल्या, पण आता भाजप त्या एकाच व्यक्तीला विकत आहे.” दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस 27 एप्रिलपर्यंत देशभरातील 57 शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे. या संदर्भात बघेल यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.