
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच कुरुंदकरची मदत केल्याप्रकरणी कुंदन भंडारी आणि यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अभय कुरुंदकर याने मीरा रोड येथील आपल्या घरी 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांच्यासह एकूण 84 साक्षीदार या खटल्यात न्यायालयाने तपासले होते. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत व आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. अश्विनी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा ठपका न्यायालयाने कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर ठेवत आरोप निश्चित केले होते. या हत्याकांडात कोणताही सहभाग आढळून न आल्यामुळे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.