निम्न तेरणा माकणी धरणात 81.660 दलघमी पाणीसाठा ; लोहाऱ्यात पाणीटंचाईपासून तूर्तास दिलासा

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आजचा जिवंत पाणीसाठा 51.693 दलघमी आजचा मृतसाठा 29.967 दलघमी उपलब्ध असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना परिसरातील पाणीटंचाईग्रत गावांना थोडासा का होईना दिलासा निश्चितच मिळाला आहे.

तालुक्यात उन्हाचा पारा आजच्या परिस्थितीत दैनंदिन 40 ते 42 डिग्री सेल्सिअस असून, यामध्ये दैनंदिन चढउतार होत आहे. ग्रामीण भागातील व शहरातील अनेक बोरवेल दररोज बंद पडत आहेत. काही बंद पडण्याचा मार्गावर आहेत. तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावांतून टँकर मागणीचे प्रस्तावही गटविकास अधिकारी पंचायत समिती, लोहारा यांच्याकडे दाखल झालेले आहेत.

गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे निम्न तेरणा धरण दोन वेळेस शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, पावसाळ्यात निसर्गाची कृपादृष्टीमुळे झाल्याने लोहारा तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला यावर्षीच्या उन्हाळ्यात सामोरे जावे लागणार नाही असे सध्या तरी चित्र आहे. परंतु, पुढील मे महिन्यात कडक उन्हाळ्याच्या दिवसांत धरणातील पाणी पातळीची दैनंदिन काय परिस्थिती असेल हे आजची सांगता येत नाही. सध्या तरी माकणी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 81.660 दलघमी उपलब्ध असल्याने समाधानकारक स्थिती आहे. यामुळे उमरगा, लोहारा, निलंगा, औसा तालुक्यांतील शहरांना ग्रामीण भागातील काही गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार नसल्याचे आशादायी चित्र आहे.

उन्हाळा कडक असल्याने पाण्याचा योग्य व जपून उपयोग करावा. धरणातील पाण्याचा संदर्भात किंवा कोणतेही पाणीपुरवठ्याची पाईप लाईन गळती असल्यास याविषयीची माहिती धरण विभागातील कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, अशा सूचना धरण उपअभियंता के. ऐनगे यांनी धरण परिसरातील नागरिकांना केली आहे.