
वाहनचोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून चोरीच्या 10 वाहनांसह 25 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बुलढाणा येथील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. समाधान देविदास राठोड (वय 25, रा. बोल्हेगाव फाटा), दादासाहेब दिलीप बावचे (वय 28, रा. सावळीविहीर, ता. राहाता), बाबा ऊर्फ आकाश रमेश बर्फे (वय 24, रा. तिनचारी, कोकमठाण) अशी गजाआड केलेल्यांची नावे आहेत. सोमा ऊर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे (रा. बोल्हेगाव फाटा), रोहन अनिल अभंग (रा. संगमनेर) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहनचोरीचा तपास करीत असताना, मिळालेल्या माहितीवरून समाधान राठोड हा त्याच्या साथीदारासह चोरीचे वाहन व दुचाकीविक्रीसाठी नगरच्या एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचून वरील तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांचे वरील दोन साथीदार पळून गेले.
यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कार व दुचाकींचा वापर कोल्हार येथे दुचाकी चोरी करताना केला असल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी चोरी केलेले दोन ट्रॅक्टर, दोन अॅक्टिवा व एक पल्सर ही वाहने एमआयडीसी बायपास रोडलगत ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने त्यांच्याकडून एक कार, सात दुचाकी व दोन ट्रॅक्टर, असा 25 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ताब्यातील संशयितांना मुद्देमालासह लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.