लाचप्रकरणी दोन भूमिअभिलेख अधिकाऱ्यांवर नोंदवला गुन्हा

भूमिअभिलेख विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले असून, जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी 50 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधिताने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

अमरसिंह रामचंद्र पाटील, उपअधीक्षक भूमिअभिलेख, हवेली, पुणे आणि किरण येटोळे भूकरमापक, भूमिअभिलेख, हवेली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे.

अष्टेकर यांची हडपसर परिसरात जागा असून, संबंधित जागेची मोजणी केली होती. मात्र, हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत 2023 पासून भू-अभिलेख विभागाकडे अर्ज केला होता. भू-अभिलेख विभागातील अधिकारी अमरसिंह पाटील व किरण येटोळे यांनी जून 2024 मध्ये संबंधित कामासाठी महिलेकडे 50 लाखांची मागणी केली होती.