चल सर्जा… चल राजा… हुर्रर्र.. आरोळीने राहुरी दुमदुमली; बैलगाडा शर्यतीत संक्रापूरच्या पाखऱ्याने मारली बाजी

‘चल सर्जा… चल राजा… हुर्रर्र…’ अशा आरोळ्यांनी राहुरी दुमदुमून गेले होते. डफ व हलगी या पारंपरिक वाद्यांचा गजर आणि बैलगाडा शर्यतीवर स्फूर्तिदायक असलेल्या गाण्यांच्या आवाजात धुळीचे लोट उठवत प्रचंड वेगाने धावणाऱ्या बैलगाडा शर्यतीने हजारोंच्या संख्येने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संक्रापूर येथील रामा पांढरे यांच्या ‘पाखऱ्या’ने बाजी मारत ७१ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले.

राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराया यात्रोत्सवानिमित्त राहुरी रेल्वे स्टेशनजवळील बीज गुणन प्रक्षेत्रावर (जमिनीत) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत एकूण २३ फेऱ्या पार पडल्या. प्रत्येक फेरीतील विजेत्या बैलगाडामालकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला बैलगाडा शर्यतीच्या थरार कार्यक्रमात सातारा येथील मयूर तळेकर यांनी केलेल्या भारदस्त निवेदनाने बैलगाडाचालक-मालकांसह प्रेक्षकांत चांगलीच ऊर्जा निर्माण केली. झेंडा पंच म्हणून किरण तळेकर यांनी काम पाहिले.

खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैलगाडा शर्यतीत सातारा येथील मयूर तळेकर यांनी केलेल्या भारदस्त निवेदनाने बैलगाडाचालक-मालकांसह प्रेक्षकांत चांगलीच ऊर्जा निर्माण केली. तर, उत्कृष्ट निवेदन केल्याने उपस्थित शर्यतप्रेमींनी त्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. झेंडा पंच म्हणून किरण तळेकर यांनी काम पाहिले. बैलगाडा शर्यत यशस्वितेसाठी देवस्थान ट्रस्ट व यात्रोत्सव समितीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
चोंडी जळगाव येथील अशोक ढोणे यांच्या ‘चिमण्या’ने दुसरा क्रमांक पटकावीत ५१ हजार रुपये आणि ‘खंडेराया केसरी’ ढालीचा मानकरी ठरला. बारामती (सुपे) च्या लोणीकर यांचा ‘हरण्या’, साकुरीचे दीपक रोहम, वसंत भाऊके, अमोल जगताप यांचा ‘गुरू’ व ‘पिष्टन’, सोन्या कडलग (सादतपूर) यांचा शंभू, विजय म्हस्के यांचा ‘पुष्पा’, रमण पवार, सोपान भिसे यांचा ‘माउली’, उंबरे येथील पैलवान ग्रुप, शनिशिंगणापूर येथील साईनाथ पवार यांचा ‘चित्र्या’, नाशिक येथील संदीप लांडगे यांचे ‘छोट्या’ व ‘रावण’, सोमनाथ जाधव यांचा ‘वाघ्या’ व हमीदभाई यांचा ‘बादशहा’ यांनी शर्यतीत निकराची झुंज देत क्रमांक दोन ते सात बक्षिसांचे मानकरी ठरले.