पहिल्या तिमाहीत संपूर्ण कर भरा, 10 टक्के सवलत मिळवा!

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. यासाठी गतवर्षी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच नागरिकांनी महापालिकेच्या विविध मालमत्ताकर सवलतीच्या विविध योजनांचा ३० जूनपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

शहरात सहा लाख १५ हजार ८६३ मालमत्ता आहेत. गतवर्षी करसंकलन विभागाने ९६६ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. महापालिकेने नागरिकांना कराचा घरबसल्या भरणा करता यावा यासह सर्व सेवा-सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. शहरातील पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत, जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरणपूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.

गत आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये तीन लाख ४९ हजार ८३८ मालमत्ताधारकांनी ४३५ कोटी मालमत्ताकर वेळेत भरला होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे मालमत्ताकर सवलत योजना
३० जून २०२५ पर्यंत आगाऊ, तसेच ऑनलाइन मालमत्ताकर भरल्यास १० टक्के सवलत, फक्त महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेस ३० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत, कंपोस्टिंग यंत्रणा, एसटीपी प्लाण्ट, ‘झीरो वेस्ट’ संकल्पना राबविणाऱ्या निवासी मालमत्तांना सामान्य करात ५ ते १० टक्के, शैक्षणिक इमारतींमध्ये ऑनसाइट कंपोस्टिंग, झीरो वेस्ट, झीरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग, झीरो वेस्ट सौरऊर्जा या संकल्पना राबविणाऱ्या मालमत्तांना सामान्य करात ४ ते १० टक्के, ‘शौर्य’ पदकधारक व माजी सैनिक, विधवा पत्नी, अविवाहित शहीद, सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के, सलग तीन वर्षे मालमत्ताकर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य कर रकमेवर २ टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.

शहरातील मालमत्ताधारकांनी गतवर्षी मालमत्ताकर वेळेत भरून सवलतींचा लाभ घेतला, ज्यामुळे ९६६ कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात महापालिकेला यश मिळाले. या वर्षींही करदात्यांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर मालमत्ताकर भरावा.
प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त