
उनाचा तडका फळभाज्या बसत असल्याने पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाली. मागणी जास्त असल्याने काकडी, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, घेवडा भावात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (२० रोजी) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंगा, हिमाचल प्रदेश ५ ते ६ टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू येथून कैरी ७ ते ८ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १४ ते १५ टेम्पो, तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती. राजस्थान येथून होणारी गाजराची आवक संपली आहे. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग शेंगा १०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमार ७० ते ८० ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
कोथिंबीर, मेथीच्या भावात वाढ
गुलटेकडी मार्केटयार्डमधील घाऊक बाजारात रविवारी (दि. २०) कोथिंबिरीची सुमारे ७५ हजार जुड्या, तर मेथीची ४० हजार जुड्या आवक झाली होती. आवक कमी झाल्याने शेकडा जुड्यांमागे कोथिंबीरच्या भावात ३०० ते ५०० रुपये, शेपू २०० ते ४०० रुपये इतकी वाढ झाली होती. तर, आवक-जावक कायम असल्याने इतर सर्व पालेभाज्यांचे मागील आठवड्यातील दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
चिकू, कलिंगड, खरबूज स्वस्त
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. मागणी कमी झाल्याने रविवारी कलिंगड, खरबूज, चिकूच्या भावात पाच ते दहा टक्के घट झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि. २०) फळबाजारात मोसंबी ३५ ते ४० टन, संत्रा ४ ते ५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ३० ते ४० टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिकू दोन हजार बॉक्स, अननस ६ ट्रक, पेरू २०० ते २५० क्रेट, स्ट्रॉबेरीची सुमारे ७०० किलो, रत्नागिरी हापूस आंबा ६ हजार पेटी, तर परराज्यांतील आंबा दीड ते दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.
फुलांचे भाव टिकून
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डमधील फूलबाजारात फुलांची आवक कमी प्रमाणात होत आहे. कट फ्लॉवर, शोभिवंत फुलांसह सर्व प्रकारच्या फुलांना मागणी साधारण असली, तरी फुलांचे गेल्या आठवड्यातील भाव स्थिर होते, अशी माहिती मार्केटयार्ड फूलबाजारातील फुलांचे आडतदार सागर भोसले यांनी दिली.
मासळीचे दर टिकून
देशाची पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. मासळीला मागणीही साधारण असल्याने मासळीचे गेल्या आठवड्यातील दर टिकून होते. उन्हामुळे चिकनच्या दरात किलोमागे १० रुपये घट झाली असून, मटण आणि गावरान, इंग्लिश अंड्यांचे दर स्थिर होते. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. २०) खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १० ते १२ टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी, चिकन अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.