बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 बंद केल्याने प्रवाशांचे हाल, होम प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरीची भीती

पुलाच्या कामाचे कारण सांगत बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत असून होम प्लॅटफॉर्मवर कोणत्याही क्षणी चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा थेट सवाल बदलापूरवासीयांनी केला आहे.

बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नोकरी-उद्योगासाठी हजारो चाकरमानी रोज लोकलने मुंबईचा प्रवास करतात. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 हा नागरिकांच्या दृष्टीने अतिशय सोयीचा आहे. मात्र 1 ते 3 फलाट क्रमांकावर पुलाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी 1 नंबर प्लॅटफॉर्म प्रशासनाने बंद केला आहे. त्याला लागूनच होम प्लॅटफॉर्मदेखील आहे. या प्लॅटफॉर्मवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल गाड्या सुटतात.
1 नंबर प्लॅटफॉर्म बंद केल्याने तेथील प्रवाशांची गर्दी आता होम प्लॅटफॉर्मवर होणार आहे. प्रवाशांना या फलाटावर येणे त्रासदायक ठरणार आहे. प्रवाशांनी रूळ ओलांडून जाऊ नये म्हणून लोखंडी रेलिंग बसवण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला. 1 नंबर फलाट बंद केल्याने त्याचा फटका महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना होणार आहे.

प्रशासन भूमिका स्पष्ट करणार
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला 1 नंबर प्लॅटफॉर्म अचानक बंद करण्यास बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. हा निर्णय एकतर्फी असून त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे. त्यासंदर्भात लवकरच रेल्वे प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले.