
अभिनव शुक्ला आणि असीम रिजाय या दोघांमधील वाद ताजा असतानाच, अभिनवला नवीन धमकी मिळाली आहे. ही धमकी केवळ साधीसुधी धमकी नसून, जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. अभिनवने स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. अभिनवसह त्याच्या कुटूंबियांनाही सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ही लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याचे सांगितले आहे. तसेच या धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलंय की, ‘मी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. त्याचप्रमाणे मी तुमच्या घरी येऊन तुमच्या घरावरही गोळीबार करेन’.
रुबिना दिलाइकचा पती अभिनव शुक्ला याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले आहे की माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या पोस्टमध्ये अंकुश गुप्ता याने, अभिनवला लिहिले की… मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे, मला तुमच्या घराचा पत्ता माहित आहे, मी येऊन तुम्हाला गोळी मारू का?
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ज्याप्रमाणे मी सलमान खानच्या घरी येऊन त्याला गोळ्या घातल्या, त्याचप्रमाणे मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला AK47 ने गोळ्या घालेन. याशिवाय, त्या व्यक्तीने अभिनवच्या कुटुंबाला आणि रक्षकांनाही धमकी दिली आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, तुम्ही कोणत्या वेळी कामावर किंवा शूटिंगसाठी जाता हे देखील त्यांना माहिती असते. असीमला काहीही चुकीचे बोलण्यापूर्वी मी तुला शेवटच्या वेळी इशारा देत आहे, तुझे नाव बातम्यांमध्ये येईल. लॉरेन्स बिश्नोई भाऊ असीमसोबत आहे.
ही पोस्ट समोर आल्यानंतर, अभिनव आणि त्याचे कुटुंबच नाही तर त्याचे चाहतेही चिंतेत आहेत. नुकताच ‘बॅटलग्राउंड’ या रिअॅलिटी शोमध्ये असीम आणि रुबिना यांच्यात वाद झाला होता. या वादावर रुबिनाचा पती अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या व्हीलॉगमध्ये एका वापरकर्त्याला उत्तर देताना म्हटले होते की, असीममध्ये फक्त मसल आहे, मेंदू नाही. मुख्य म्हणजे असीमचे वर्तन अजिबात योग्य नाही हे काही चांगल्या फिटनेसचं लक्षण नाही. याच शोमधून असीम आणि अभिनव यांच्या भांडणाची सुरुवात झाली होती.