वडाळ्यात रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यावरून गदारोळ

रामनवमीनिमित्ताने शोभायात्रा काढण्यावरून वडाळ्यात आज गदारोळ झाला. पोलिसांनी शोभायात्रा काढण्यास परवानगी नाकारल्याचे म्हणत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर संध्याकाळी शांततेत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेकडून आज शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय त्यांनी लाठीचार्जदेखील केल्याचे त्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र असे काहीच घडले नाही. कोणावरही लाठीचार्ज करण्यात आला नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. अखेर संध्याकाळी त्या कार्यकर्त्यांनी पोलीस बंदोबस्तात शोभायात्रा काढली.