पार्ल्यात पाडलेल्या जागीच उभे राहणार नवे जैन मंदिर, भाविकांना अश्रू अनावर; मंदिरात पूजा

विलेपार्ले येथे बुधवारी पालिकेने मुजोरपणे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असून याच ठिकाणी आम्ही नव्याने मंदिर बांधणार असल्याचा निर्धार जैन बांधवांनी व्यक्त केला आहे. मंदिर पाडलेल्या ठिकाणी आज जैन बांधवांनी मंदिरात पूजा केली. यावेळी आपल्या श्रद्धास्थानावर कारवाई केल्याने भाविकांना अश्रूही अनावर झाले.

न्यायालयात सुनावणी होणे बाकी असताना विलेपार्ले पूर्व येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने बुलडोझर फिरवल्याने जैन बांधवांनी शनिवारी मोर्चा काढला. पालिकेकडून मंदिरावर केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई करणारे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगेंची प्रशासनाकडून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, जैन बांधवांनी मोठय़ा संख्येने एकत्र येत मंदिराच्या ठिकाणी पूजा केली. पालिकेने मंदिरावर बुलडोझर फिरवल्याने या ठिकाणी मंदिराचा दरवाजाही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे भाविकांच्या डोळय़ातून अश्रू तरळले. पालिकेने ही कारवाई करणाऱया अधिकाऱयाची हकालपट्टी केल्यामुळे ही कारवाई अयोग्य असल्याचे स्पष्ट असल्याचे जैन बांधवांनी म्हटले आहे. हा आमचा खूप मोठा विजय असून जोपर्यंत मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धारच जैन बांधवांनी केला आहे.

जैन बांधवांची पालिका अधिकाऱयांसोबत चर्चा

मंदिराला नोटीस आल्यानंतर जैन बांधवांनी न्यायालयात धाव घेतली. याबाबत 17 एप्रिलला सुनावणी असताना 16 एप्रिललाच पालिकेने कारवाई केली. त्यामुळे पालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका अधिकाऱयांची जैन समाजासोबत शनिवारी दोन तास बैठक चालली. या ठिकाणच्या एका रेस्टॉरंट मालकाच्या सांगण्यावरून पालिकेने ही कारवाई केल्याचे जैन बांधवांचे म्हणणे आहे.

सत्ताधारी केवळ नाटक करताहेत!

मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या मुख्यमंत्री कार्यालयातून चालवला जात आहे. शिवाय आंदोलनात सहभागी होणारे स्वतः त्या जिह्याचे सहपालमंत्री आहेत. असे असताना मोर्चात सहभागी होऊन निषेध कसला करता, असा थेट सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर उपस्थित करून भाजपला टोला लगावला आहे. ही कारवाई थांबवण्याची संधी त्यांना होती. असे असताना कारवाई झाली. त्यामुळे सत्ताधारी मुंबईकरांशी खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नेहमीप्रमाणे यावेळी अधिकारी बदलला गेला, पण मंत्र्यांवर कारवाई कधी करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.