
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स उद्या हिंदुस्थानच्या चार दिवसांच्या दौऱयावर येत असून ते सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकी दरम्यान अमेरिकेतून अवैध हिंदुस्थानी नागरिकांची परत पाठवणी करताना दिलेली वागणूक तसेच जागतिक व्यापार संघटनेतील बहुपक्षीय व्यापार करार अमेरिकेने पूर्णपणे नष्ट करून टाकला. या मुद्दय़ांप्रकरणी वान्स यांच्यासमोर चिंता व्यक्त करणार का? हे मुद्दे बैठकीत उचलणार का, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यांच्या पालकांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून या विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले आहे, याचा विचार करून मोदी याबाबतचा मुद्दा उपराष्ट्राध्यक्षांसमोर मांडणार का? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. वान्स हे पत्नी उषा आणि तीन मुलांसह सोमवारी सकाळी 10 वाजता हिंदुस्थानात दाखल होणार आहेत.
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसच्या आजपासून 57 शहरांत पत्रकार परिषदा
सूडबुद्धीने नॅशनल ‘हेरॉल्ड’प्रकरणी बजावण्यात आलेली नोटीस आणि आरोपपत्र तसेच विविध मुद्दय़ांवर काँग्रेस 21 एप्रिलपासून 57 शहरांत पत्रकार परिषदा घेऊन भाजपचा खोटारडेपणा उघड करणार आहे. 21 ते 24 एप्रिलदरम्यान काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाओ रॅली’ काढण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी आज दिली.