किडनी दाता शोधणे सोपे होणार, अवयव दात्याची स्वॅप रजिस्ट्री करा; केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना

एखाद्या व्यक्तीची किडनी काम करत नसेल तेव्हा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती स्वतःची किडनी त्याला दान करण्यास तयार असते. मात्र काही वेळेला किडनी जुळत नाही अशा वेळी किडनी जुळत नसलेली दोन कुटुंबे एकत्र येऊन दात्यांची अदलाबदल करत किडनी दान करतात. या प्रकाराला किडनी स्वॅप प्रत्यारोपण असे म्हणतात. यासाठी किडनी जुळत नसलेल्या कुटुंबीयांची स्वॅप रजिस्ट्री असणे गरजेची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (नोटो) अशा पद्धतीची राष्ट्रीय स्वॅप रजिस्ट्री तयार करण्याच्या सूचना सर्व राज्यांतील स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) यांना दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावर ‘नोटो’ ही संस्था अवयव दान नियमन करते, तर राज्यात ‘सोटो’ ही संस्था. ‘नोटो’ने 16 एप्रिलला राज्यांना पत्र पाठवून ‘वन नेशन वन स्वॅप ट्रान्सप्लांट प्रोग्राम’ तयार करण्यासाठी सहभाग घेण्याचे कळवले आहे.

काय आहे स्वॅप रजिस्ट्री

किडनी निकामी झालेल्या रुग्णाला कुटुंबातीलच सदस्य किडनी देण्यास तयार असतो. मात्र त्याचा रक्तगट जुळत नाही. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांटसाठी वाट पाहावी लागते. मात्र आता या किडनी दात्याचे आणि रुग्णाचे रजिस्ट्रीमध्ये नाव नोंदविले जाते. ज्या वेळी त्यांचा रक्तगट जुळणारे दुसरे कुटुंब येते तेव्हा दोन कुटुंबातील दात्यांची अदलाबदल करून ट्रान्सप्लांट करतात.