फार्महाऊसनंतर आता उभं राहतंय स्वप्नातलं वन! मधुगंधा आणि परेश मोकाशीचा ‘हिरण्य’ प्रवास

अनेक कलाकार शहरापासून दूर जात निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःचे फार्महाऊस बांधत आहेत. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीदेखील या पंक्तीत जाऊन बसले आहेत. लोकप्रिय जोडप्याने वाडा येथे फार्महाऊस उभारलंय. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून मधुगंधाने फार्महाऊसची गोष्ट सांगितली.

व्हिडीओमध्ये मधुगंधाने म्हटलंय की, मी आणि परेश आम्ही दोघेही शेतकरी. आमच्या फार्महाऊसचं नावं ‘हिरण्य’ आहे. हिरण्य म्हणजे सोनं! आमच्यासाठी हे फार्महाऊस सोन्या इतकंच अमूल्य आहे. कारण हे मिळविण्यासाठी 12 ते 15 वर्षे कष्ट करावे लागले आहेत. एक वैराण जमीन विकत घेतली. त्याच्यावर घर बांधले आणि त्याच्या आजूबाजूला वन उभं करूया, असं आम्ही स्वप्न बघितलं. त्यामुळे दरवर्षी आम्ही थोडी थोडी झाडं लावून आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करत आहोत. फार्महाऊसचा आनंद काय आहे माहिती आहे का, इथे आपण जागे होतो पक्ष्यांच्या किलबिलांटांनी. हे सुख शहरात मिळत नाही.