
सर्वोच्च न्यायालय व सरन्यायधीश संजीव खन्ना यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात गुन्हेगारी अवमान कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र अॅटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांना पाठवण्यात आले आहे. वक्फ कायद्याबाबत बोलताना निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती.
भारतीय जनता पक्षाचे झारखंडच्या गोड्डा येथील खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी एक वादग्रस्त वक्तव्य करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. सर्वोच्च न्यायालय आपली लक्ष्मण रेखा पार करत आहे. संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांना रद्द करत आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपतींनाही निर्देश देत आहे. तुमची नियुक्ती करणाऱ्यांना तुम्ही निर्देश कसे देऊ शकता? राष्ट्रपती देशाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि घटनेच्या अनुच्छेद 368 नुसार संसद देशाचे कायदा बनवते. तुम्ही संसदेलाच हुकूम देणार? आणि कोणत्या कायद्यात असे लिहिले आहे की राष्ट्रपतींनी 3 महिन्यात विधेयकावर निर्णय घ्यावा? याचा अर्थ तुम्ही देशाला अराजकतेकडे घेऊन जाऊ इच्छिता. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावे लागत असेल तर संसद बंद केली पाहिजे, असे निशिंकात दुबे म्हणाले होते.